

कोल्हापूर : सागर यादव
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व आंध— प्रदेशातून लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल होतात. ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी यात्राकाळात हजारो हात दिवस-रात्र राबतात.
जोतिबा देवस्थानच्या वर्षभरातील नियमित पूजा-अर्चा व व्यवस्थेसाठी होणार्या खर्चाकरिता पूर्वापार जमिनी इनाम देण्यात आल्या आहेत. देवस्थानास कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी, गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ या सात तालुक्यांतील 364 गावांचे उत्पन्न आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज मळा, बुधगाव येथील जमिनी इनाम आहेत. प्रत्येक गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत या जमिनींचे उत्पन्न घेण्यासाठी संस्थानकाळापासून कायदेशीर नोंदी आहेत. याशिवाय प्रत्येक गावातील जोतिबा भक्तांचे गुरवसुद्धा वंशपरंपरेने ठरलेले आहेत. जोतिबा डोंगरावरील गुरव घराण्यात लादे, शिंगे, दादर्णे, चौगले, सांगले, भिवदर्णे, मिटके, चिखलकर, धडेल अशी कुटुंबे (भावकी) आहेत.
लोकप्रतिनिधी, कोल्हापूर जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस दल, वाहतूक नियंत्रण विभाग, आरोग्य विभाग, सहज सेवा ट्रस्ट, आर.के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका, एस.टी. महामंडळ, व्हाईट आर्मी, जीवन ज्योती, कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर व फोर व्हीलर मॅकेनिकल असोसिएशन, मावळा कोल्हापूर, शिवशक्ती प्रतिष्ठान, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच अशा सेवाभावी संस्था-संघटना, तालीम व तरुण मंडळे निरपेक्ष वृत्तीने दरवर्षी सेवा देत असतात.