नाशिक : दशक्रियेसाठी सगळे कुटुंब परगावी गेले अन् चोरट्यांनी डाव साधला | पुढारी

नाशिक : दशक्रियेसाठी सगळे कुटुंब परगावी गेले अन् चोरट्यांनी डाव साधला

नाशिक (लासलगाव) वार्ताहर  
आईच्या वियोगाच्या दु:खात असतानाच दशक्रियेसाठी सगळे कुटुंब परगावी गेले.  इकडे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून लंपास केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे घडली. या घरफोडीत 38 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने तर रोख 30 हजार रुपये चोरून अज्ञात चोरट्यानी पोबारा केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाऊसाहेब रुंजा पवार राहणार मरळगोई, हल्ली मुक्काम किल्ल्याच्या पाठीमागे, लासलगाव हे घराला कुलूप लावून त्यांच्या आईचा दशक्रिया विधी करण्यासाठी कुटुंबासह मरळगोई येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील शोकेस चे लॉकर तोडून 30 हजार रुपये रोख तसेच 11 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 5 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे झुमके, 5 हजार 500 रुपये किमतीचे वेल व लटकन, 16 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेली पोत असा एकुण 68 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ हे पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले व आजूबाजूला असलेल्या सी सी टी व्ही च्या आधारे तपासकार्य सुरू केले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक उपनिरीक्षक सुराशे करत आहे.

हेही वाचा :

Back to top button