वाडा ; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या भीमा नदी पात्रातील चासकमान धरणात वैयक्तिक स्वार्थासाठी काही मासेमारांकडून शेतात फवारणी करण्याच्या सायपरमेथ्रीन, क्लोरोपायरीफोस यांसारख्या विषारी कीटकनाशकांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. या औषधांच्या वापरामुळे मोठे मासे भोअळ येऊन नदीकिनारी येतात, तर लहान मासे मात्र मृत होत असून, नदीकिनारी मोठ्या प्रमाणात दिसतात. हे मासे सडल्याने मोठी दुर्गंधी पसरत असून, परिणामी नदीपात्र दूषित होऊन विषारी बनले आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान धरणात विस्तृत जलसाठा असल्याने या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असते. खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांतील मच्छीमार या ठिकाणी येऊन मासेमारी करतात. परंतु, काही जास्त मासे मिळविण्यासाठी मासेमारी केली जाते. परिणामी, भीमा नदीतील जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
चासकमान धरणाच्या बॅकवॉटरला असणाच्या भीमा नदी पात्रात रात्रीच्या वेळी येऊन विषारी कीटकनाशके टाकतात. यामुळे अवघ्या काही मिनिटांत लहान-मोठे मासे मृत होत असून, यातील मोठे मासे विक्रीसाठी आणली जातात व लहान मासे नदीकिनारी फेकून दिले जात आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे.
औषधांच्या वापरामुळे भीमा नदी पात्रातील पाणी विषारी झाले आहे. नदीचे पाणी स्थानिक नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याने या पाण्यापासून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेकांना जुलाब व उलट्यांचा त्रास होत असल्याचे नागरिक सांगतात.
मासेमारीसाठी वापर केलेले कीटकनाशकांचे डबेही नदीकिनारीच टाकून दिले जातात. रात्रीच्या वेळी औषधांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या मासेमारांना स्थानिकांनी अनेकदा रोखले. परंतु, हे मासेमार त्यांना दाद देत नसल्याचे नदीकिनारी वास्तव्यास असणारे नागरिक सांगतात.
रात्रीच्या वेळी मच्छीमार नदीपात्रात कुठल्या तरी विषारी औषधांचा वापर करीत मासेमारी करतात. यामुळे माझ्या वीटभट्टीवर असणारे कामगार नदीचे पाणी प्यायल्याने त्यांना जुलाब व उलट्या होऊ लागल्या. या नदीचे पाणी वाडा व पश्चिम भागातील अनेक गावे पिण्यासाठी वापरत असतात. असे विषारी पाणी पिऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
– भगवान लांडगे, माजी सरपंच, वाडा