धुळे : सुरळीत विजेसाठी किसान सभेचे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन | पुढारी

धुळे : सुरळीत विजेसाठी किसान सभेचे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन

धुळेः पुढारी वृत्तसेवा 
शेतीकरिता नियमित वीजपुरवठ्यासह इतर मागण्यांसाठी धुळे जिल्हा किसान सभेच्यावतीने शिरपूर तालुक्यातील बाभलाज येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या बाभलाज सब स्टेशनचे सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांच्या समोर व्यथा मांडली. गेल्या आठ दिवसांपासून शेतीसाठी मिळणारा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात टरबूज, केळी, पपई वगैरे बागायती पिके पाण्याअभावी करपून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्हा किसान सभा व लालबावटा शेतमजूर युनियनने आंंदोलन छेडत निवेदन दिले आहे. शेतीसाठी अखंड बारा तास वीज पुरवठा द्यावा, विजे अभावी पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई द्यावी, बाभलाज सब स्टेशन मधील संपर्क क्रमांक त्वरित सुरू करावा, तरडी, बबळाज, हिसाळे, तोंडे वगैरे गावातील जीर्ण विद्युत वाहिन्या नूतनीकरण करावी, तरडी येथील शिव बारीपाडा आदिवासी वस्तीतील रहिवाशांना इलेक्ट्रिकल पोल डीपी बसून द्यावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या असून तालुका सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हिरालाल परदेशी, शेतमजूर युनियनचे धुळे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. संतोष पाटील, किसान सभेचे कांबळे अर्जुन कोळी, शेतमजूर युनियनचे कवरलाल कोळी, रविंद्र पाटील, तुळशीराम पाटील, विश्वास देवरे, नंदलाल राजपूत, प्रभू सिंग राजपूत, शेतमजूर शिवा पावरा, सुभाष पावरा आदी शेतक-यासह शेतमजूर उपस्थित होते. तसेच थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे देखील उपस्थित होते. निवेदनाची दखल घेत त्वरीत वीज पुरवठा रविवार (दि.10) पासून आठ तास सुरळीत ठेवण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Back to top button