तरुण IAS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; मेळघाटातील आदिवासी पोरके झाल्याची भावना | पुढारी

तरुण IAS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; मेळघाटातील आदिवासी पोरके झाल्याची भावना

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : धारणी एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे (आयएएस) यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर दीड वर्षातच तरुण अधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची आदिवासी विकास विभागात ओळख होती.

मेळघाटात मोहा बँकेची स्थापना

आदिवासी भागातील नागरिकांच्या सदैव विकासासाठी त्यांनी मेळघाटातील खेड्यापाड्यात मोहा बँकेची स्थापना केली होती. त्यातून त्यांनी स्वतःचे नेटवर्क उभे केले होते. कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी वचक निर्माण केला होता. मुळचे वाशिम पंढरपूरचे ते रहिवाशी होते. जुलै २०२१ मध्ये येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झाले होते.

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने दीड वर्षातच राजीनामा देणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अलिकडच्या काळातील पहिलेच प्रकरण असावे. त्यांच्या अकस्मात राजीनाम्यामुळे आदिवासी समाजात दु:ख व्यक्त होत आहे. येथे रूजू होताच त्यांनी मेळघाटातील संपूर्ण खेड्यांत आदिवासी युवकांची मोहा बँकेची एक फळी उभी केली होती.

मोहा बँकेच्या माध्यमातून त्यांनी येथील आदिवासी युवकांना योजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे मेळघाटातील आदिवासी पोरके झाले. गावागावात मोहा बँकेच्या माध्यमातून त्यांनी योजना आदिवासींच्या दारात पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या राजीनामा देण्यामागेच्या कारण जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी निर्णय

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत वैभव वाघमारे यांनी आपल्या नोकरीचा दिल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. जीवनात काहीतरी अजून चांगले व उद्दात्त करण्याच्या शोधापोटी आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगून आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला आहे.

२०१९ च्या कॅडरमधील अधिकारी असलेले वैभव वाघमारे यांची एक वर्षांपूर्वी धारणी प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती झाली. केवळ कार्यालयात बसून काम न करता आदिवासींसोबत खाली बसून त्यांच्या विकासासाठी त्यांनी काम केले आहे. मोहफुलांच्या माध्यमातून मेळघाटातील सुमारे ३०० गावांत मोहफुल बँक नावाची संकल्पना रुजविली. यातून शार्क थिंक प्रोजेक्ट अंतर्गत नुक्लिअर बँकेमार्फत स्थानिक गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

आठ एप्रिल रोजी आदिवासी आश्रमशाळा टिटंबा येथे आदिवासी विकास योजनांची माहितीसाठी मेळघाट विकास दूत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आदिवासी बंधू-भगिनींना उद्देशून बोलताना म्हटले की, तुमची समस्या दोन वेळचे जेवण आहे. तुमची ही समस्या केवळ तुम्ही स्वतः अनुभवता. ही समस्या सुटण्यासाठी तुमच्यातील व्यक्तींनी अधिकारी होणे गरजेचे आहे. ज्या दिवशी ही समस्या सुटेल त्या दिवशी मेळघाटचा खरा विकास होईल, असे सांगितले होते.

वैभव वाघमारे यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून कोरोना काळातील लसीकरणासंदर्भात उल्लेखनीय कार्य केले आहे. गत एक महिन्यात स्वतःला बंदिस्त करीत अनेक पुस्तकांचे वाचन त्यांनी केले. यामधून प्रेरणा घेत व्यक्तीला केवळ दहा हजारांत उत्तम जीवन जगता येते. नोकरीचा राजीनामा देण्याच्या धाडसामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार मानले. आयएएस, आयआरएस, आयआरएएस अशा तीन सर्वोच्च मानाच्या पदावरील तीन वर्षांच्या काळात जीवनाचा इतका समृद्ध अनुभव दिला जो मिळविण्यासाठी 20-30 वर्षांचा कालावधी लागला असता. आयएएस देशातील सर्वोत्तम नोकरी आहे, पण ते एखाद्याला आवडेलच व त्याने ती आयुष्यभर केलीच पाहिजे हे आवश्यक आहे का? असा प्रतिप्रश्न करीत सोशल मीडियावर आपल्या राजीनाम्याबाबत निर्णय जाहीर केलेला आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button