नाशिक : आजारी नद्यांवर उपचाराची गरज : डॉ. सिंह ; गिरणा गौरव पुरस्काराचे वितरण | पुढारी

नाशिक : आजारी नद्यांवर उपचाराची गरज : डॉ. सिंह ; गिरणा गौरव पुरस्काराचे वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाणी, स्त्री आणि नदीला देव मानणे ही आपली संस्कृती आहे. भारतीय लोक नदीला माताही संबोधतात. परंतु सद्य:स्थितीत भारतातील नद्यांची दयनीय अवस्था पाहता त्या आजारी झाल्या आहेत. गंगा-गोदावरी नदी अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करून जलसंवर्धन आणि नद्यांची जोपासना करणारे उपक्रम, योजना राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलपुरुष, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह (पाणीवाले बाबा) यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे मंगळवारी (दि. 5) पार पडलेल्या गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक तथा वात्रटिकाकार रामदास फुटाणे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, आनंद ग्रुपचे अध्यक्ष उद्धव आहेर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मुळे, उद्योगपती निखिल रुंगटा, ज्येष्ठ उद्योजक नेमीचंद पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थींची निवड समितीचे अध्यक्ष कवी राजू देसले, प्रकाश होळकर, डॉ. निर्माण फडके, डॉ. स्वप्नील तोरणे, प्रवीण बांदेकर यांनी केली. लेखिका स्वाती पचपांडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पवार यांनी आभार मानले.

‘नदीजोड प्रमाणे माणसंजोड’
याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ना. भुजबळ म्हणाले की, नदीच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार ऊर्जा देणारा आहे. आम्ही सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना नदीजोड प्रकल्पासारखेच माणसंजोड प्रकल्प राबवत असतो. पुरस्काराने भुजांमध्ये आणखी बळ मिळाले असून, कोरोनामुक्तीकडे झालेली आपली वाटचाल पाहता सर्वांनी आपापल्या क्षेत्रात झोकून देत विकासाची वाट चोखाळण्याचे आवाहनही ना. भुजबळ यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, राजन गवस, डॉ. राजेंद्र भारूड, डॉ. दिलीप स्वामी, शंभू पाटील, भास्कर पेरे-पाटील, संदेश भंडारी, पै. हर्षवर्धन सदगीर, सुमती लांडे, मंगला बनसोडे, प्रा. प्रशांत मोरे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, नीलिमा मिश्रा, डॉ. निशिगंधा वाड, गुरू ठाकूर, शिल्पा देशमुख, मच्छिंद्र कदम, वैशाली बालाजीवाले, खंडू मोरे, शिवाजी मानकर, डॉ. राजन पाटील, डॉ. अनिल निकम, मिलिंद पुरी, अ‍ॅड. पंकज चंद्रकोर, रुख्मिणीताई दराडे, विनोद ठाकरे, रेखा महाजन, सुरेखा भालेराव, गंगा पगार, कैलास खैरनार, बंडू बच्छाव,नानाजी जाधव, यांचा सन्मान झाला. तसेच विलास औरंगाबादकर यांना मरणोत्तर गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button