राज्याने दिले, पण केंद्राने हिसकावले! | पुढारी

राज्याने दिले, पण केंद्राने हिसकावले!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने व्हॅटमध्ये कपात करून स्वस्त केलेला सीएनजी आणि पीएनजी केंद्र सरकारने पुन्हा महाग केला आहे. व्हॅटमध्ये कपात झाल्याने मुंबईतील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात महानगर गॅस लिमिटेडने 1 एप्रिलपासून थेट 10 टक्क्यांपर्यंत कपात केली होती.

मात्र केंद्राने 110 टक्क्यांनी नैसर्गिक वायूचे दर वाढवल्याने महानगरने बुधवारपासून पुन्हा सीएनजीत 7 रुपये, तर पीएनजीत 5 रुपयांची दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला.

राज्य शासनाने व्हॅटचे दर 10.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महानगर गॅसने 31 मार्चला सीएनजी दरात 6 रुपये, तर पीएनजी दरात 3.50 रुपयांच्या कपातीची घोषणा केली होती. त्यामुळे सीएनजीचे दर 66 रुपयांवरून थेट 60 रुपयांपर्यंत खाली आले होते. याशिवाय पीएनजी दरातही साडेतीन रुपयांची कपात करून कंपनीने दर 36 रुपयांपर्यंत कमी केले होते.

आता केंद्राने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 110 टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने महानगरची कोंडी झाली. पाच दिवस वाट पाहिल्यानंतरही दर कपात होत नसल्याने अखेर महानगरकडून मुंबईत सीएनजी दरात 7 रुपये, तर पीएनजी दरांमध्ये तब्बल 5 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीएनजीचे दर 67 रुपये प्रतिकिलोपर्यंत, तर पीएनजी दर 41 रुपये प्रति एससीएमपर्यंत वाढवल्याचे महानगरच्या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

Back to top button