मुंबई : यंदा कॉलेज प्रवेशांत 12.5% घट | पुढारी

मुंबई : यंदा कॉलेज प्रवेशांत 12.5% घट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई विद्यापीठांतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील महाविद्यालयांत 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल 12.5 टक्के घट झाली आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये मुंबईत महाविद्यालयीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख होती. ही संख्या 2021-22 मध्ये दोन लाख 60 हजारांपर्यंत म्हणजे साडेबारा टक्क्यांनी कमी झाली. वाणिज्य शाखेतील विद्यार्थीसंख्या सर्वाधिक म्हणजे 21 हजार 147 ने घटली असली, तरी टक्केवारीनुसार विज्ञान शाखेतील विद्यार्थीसंख्या सर्वाधिक 18 टक्क्यांनी कमी झाली आहे.

प्रवेश घेतलेल्या आणि प्रत्यक्ष महाविद्यालयांत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही 30 टक्के तफावत असल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे. पदवीचे पहिले व दुसरे वर्ष पूर्ण करून पुढील वर्षात प्रवेश घेतलेले बहुतेक विद्यार्थी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन वर्गात उपस्थित राहात नसल्याचे आढळले आहे. यावर उपाययोजना आवश्यक असल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे.

अशी आहेत कारणे

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू, अनेकांचे पालक बेरोजगार.
कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेशाकडे पाठ.
मागील दोन वर्षांत ऑनलाईन शिक्षणामुळे अपुरी साधने; बारावीनंतर शिक्षणापेक्षा नोकरीकडे कल.

Back to top button