मुंबई : शुल्कासाठी विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

मुंबई : शुल्कासाठी विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करणे, त्यांना अन्य विद्यार्थ्यांसमोर अपमानित करून मानसिक त्रास देणे अशा तक्रारींची शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणांत कांदिवली पश्चिमेकडील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुण्यातील उंड्री येथील युरो स्कूलला नोटीस देण्यात आली आहे.

कोविड-19 संदर्भातील निर्बंधांमुळे यावर्षी शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आला. कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना विलंब झाला आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या आधार द्यावा तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी कृती करणार्‍या शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला होता.

असे असतानाही कांदिवली पश्चिमेकडील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल आणि पुण्यातील उंड्री येथील युरो स्कूलमध्ये शुल्काची काही रक्कम थकीत असलेल्या विद्यार्थ्यांना अपमानस्पद वागणूक दिली जात होती. या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे केले जात असे. इतर विद्यार्थ्यांसमोर त्यांना अपमानित करून मानसिक त्रास दिला जात असे.

यासंदर्भातील तक्रारी आल्या होत्या. त्यांची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने कांदिवलीतील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य रेश्मा हेगडे यांच्याविरुद्ध तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे पुणे शिक्षण उपसंचालकांनी उंड्री येथील युरो स्कूलला भेट देऊन चौकशी केल्यानंतर नोटीस बजावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news