नाशिक : हेल्मेटसक्तीच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ चालकांवर कारवाई | पुढारी

नाशिक : हेल्मेटसक्तीच्या पहिल्या दिवशी 'इतक्या' चालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिसांनी शनिवार (दि. 2)पासून पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी शहरातील विविध भागांत कारवाई करीत वाहतूक शाखेने 186 दुचाकीस्वारांवर कारवाई करीत, 93 हजार रुपयांचा दंड आकारला आहे. दुचाकीचालकासह पाठीमागे बसणार्‍या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याने त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढल्याने पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरात 15 ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती केली. त्यात वेगवेगळ्या मोहिमा राबविण्यात आल्यात. याआधी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन व परीक्षा घेण्यात येत होत्या. त्यानुसार शहरातील 12 ठिकाणी समुपदेशन केंद्रे उभारून तिथे 53 हजार 161 चालकांचे समुपदेशन करण्यात आले, तर 14 हजार 116 चालकांना 75 लाख 83 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव, वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या यामुळे या मोहिमा थंडावल्या होत्या. त्यानंतर आता शनिवार (दि. 2)पासून पुन्हा हेल्मेटसक्ती मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी पहिल्या दिवशी शहर वाहतूक पोलिसांनी 183 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली.

यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस तैनात होते. त्यांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्यावर कारवाई केली. त्यात ई-चलनाद्वारेही दंड आकारण्यात आला. अनेकांनी कारवाई टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला, तर काहींनी विनंती करून कारवाईतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी हेल्मेट सोबत बाळगले होते. मात्र, ते परिधान केलेले नसल्याने अशा दुचाकीस्वारांवरही पोलिसांनी कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button