सांगली : धर्मांध शक्तीविरुद्ध सामाजिक ऐक्य महत्त्वाचे : खा. शरद पवार | पुढारी

सांगली : धर्मांध शक्तीविरुद्ध सामाजिक ऐक्य महत्त्वाचे : खा. शरद पवार

शिराळा : पुढारी वृत्तसेवा

देशातील धर्मांध शक्तीविरोधात व सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले, त्यांच्यावर टीका करण्याचे काम देशाचे नेतृत्व करीत आहे, ही बाब दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

शिराळा येथे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात खा. पवार बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुण लाड उपस्थित होते.

खा. पवार पुढे म्हणाले, देशात वेगळ्या लोकांच्या हाती सत्ता आहे. देशाचे राजकारण वेगळ्या पद्धतीने धर्माच्या नावावर सुरू आहे. राज्याचे राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. साखर कारखानदारीतील नवीन तंत्राबाबत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, यापुढे कारखान्यांनी
केवळ साखर तयार न करता इथेनॉल तयार करावे. साखर गोडावूनमध्ये ठेवून त्यावर कर्ज काढून ऊस दर द्यावयाचा, यापेक्षा डिस्टलरी उभा करून इथेनॉल व इतर उपपदार्थ तयार करावेत.

पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांनी वाकुर्डे योजनेसाठी व शिराळा तालुक्यातील डावा, उजवा कालवा यासाठी 664 कोटी एवढा निधी दिला आहे. यामागे आमदार मानसिंगराव नाईक यांची चिकाटी मोठी आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेशाच्या गुढीचा परिणाम 2024 मध्ये दिसेल. एक अनुभवी व जेष्ठ नेते राष्ट्रवादीमध्ये आलेत, त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल. शिवाजीराव नाईक कोणत्याही घरात गेले असले तरी शेवटी ते माझ्याच घरात येतील याची मला खात्री होती. 2024 पर्यंत एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही.

माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातून पश्चिमेकडून वाहणारे राष्ट्रवादीचे वारे राज्यात जाईल. खा. शरद पवार हेच महाराष्ट्राची प्रगती करू शकतात व ताकद देऊ शकतात. आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादी अधिकच भक्कम होणार आहे.जयंत पाटील यांच्यामुळे शिराळा मतदार संघात 5200 एकर शेतीला पाणी मिळाले असून नव्याने 600 एकर जमीन योजनेत समाविष्ट केली आहे.

शिराळा भुईकोट किल्लावरील धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक, चांदोली जलपर्यटन, वनपर्यटन लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वेळी खा. श्रीनिवास पाटील, साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. महिला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुस्मिता जाधव, रणधीर नाईक, सारंग पाटील, अमरसिंह नाईक, अविनाश पाटील, बाळासाहेब मुळीक, विश्वप्रताप नाईक, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, राजेंद्रसिंह नाईक उपस्थित होते.

Back to top button