कर्नाटक : कडोली बसवाण्णा यात्रेत मधमाशांचा हल्‍ला; 15 जखमी | पुढारी

कर्नाटक : कडोली बसवाण्णा यात्रेत मधमाशांचा हल्‍ला; 15 जखमी

कडोली : पुढारी वृत्तसेवा
कडोली बसवाण्णा यात्रेत मधमाशांनी तुफान हल्‍ला चढविल्याने 15 जण जखमी झाले. या काळात यात्रा विस्कळीत झाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बसवाण्णा यात्रा गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दुपारपासून गर्दीला सुरुवात झाली. सायंकाळी वाजतगाजत सुशोभित बैलजोड्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी आल्या. हक्‍कदार, देवस्थान पंच कमिटीने गार्‍हाणे घातल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण होत असतानाच अचानक मधमाशांनी भक्‍तांवर हल्‍ला चढविला.

मंदिराच्या बाजूला भलेमोठे आंब्याचे झाड आहे. आंब्याच्या झाडावर मधमाशांचे मोहोळ होते. झाडाखाली उदबत्ती कुंड होते. उदबत्ती कुंडातील धुरामुळे मधमाशा बिथरल्या आणि प्रथमतः झाडावरच असलेल्या माकडांना त्यांनी दंश करायला सुरुवात केली. त्यामुळे माकडेही बिथरली आणि त्यांनी एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर उड्या मारण्यास सुरुवात केली. फांद्या हलल्यामुळे मधमाशा अधिकच बिथरल्या आणि त्यांनी झाडाखाली मंदिर परिसरातील सुशोभित बैलगाड्या, शेतकरी, भक्‍तगण, गर्दीवर हल्‍ला चढविला.

सुशोभित बैलजोड्या पळविण्यात आल्या. मात्र, चारचाकी, दुचाकी, सायकलस्वार भक्‍तांनी सर्व वाहने तेथेच सोडून पळ काढला. सुमारे अर्धा तासानंतर मधमाशा शांत झाल्या. मात्र, भक्‍त परत मंदिराकडे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे यंदा आंबिल -घुगर्‍या मंदिर परिसरात वाटण्याऐवजी बाजारपेठेत वाटण्यात आल्या. जखमींनी खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले.

Back to top button