नाशिकमध्ये 31 मार्चला गोळीबाराची प्रात्यक्षिके ; ‘या’ ठिकाणी जाण्यास मनाई | पुढारी

नाशिकमध्ये 31 मार्चला गोळीबाराची प्रात्यक्षिके ; 'या' ठिकाणी जाण्यास मनाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना व देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूलतर्फे इगतपुरी व नाशिक तालुक्यातील ‘एक्स सेक्टर’ या ठिकाणी 31 मार्चला सकाळी 6 ते सायंकाळी 4 या वेळेत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव तर्‍हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वार शिंगवणे, तळवाडी, कवडदरा, सामनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदूरवैद्य, टाकेद बुद्रूक, धामणगाव, नांदगाव बुद्रूक, साकूर दुमाला, बेळगाव कुर्‍हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरवीर खुर्द, लहवित, अस्वली तसेच वंजारवाडी (ता. नाशिक) या गावांच्या मुलकी हद्दीतील काही भाग तोफांच्या मार्‍याच्या रेषेत येतात. संबंधित ‘एक्स सेक्टर’ या क्षेत्रात गावातील नागरिकांना जाण्यास प्रतिबंध असून, या क्षेत्रात जनावरांना जाऊ देऊ नये. याबाबत संबंधित गावांमध्ये जाहीर दवंडी देण्यात आली आहे.

प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास, त्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही. या सूचनेचा भंग केल्यास त्या व्यक्तिविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही भागवत डोईफोडे यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button