Russia-Ukraine war : युद्ध ‘तिघांचे’, फायदा चीनचा!

file photo
file photo
Published on
Updated on

अमेरिका आणि 'नाटो' एकीकडे प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होेता दुसरीकडे युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा करत असल्याने रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) दिवसेंदिवस लांबत चालले आहे. युद्धाने युक्रेनला उद्ध्वस्त केले. रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले. युरोपला असुरक्षित बनवले आणि अमेरिकेचा महासत्तेचा दर्जा अस्थिर झाला; पण या सर्वांतून चीनचा मात्र फायदा झाला. रशियाप्रमाणे अमेरिका चीनवर आर्थिक निर्बंध लादू शकत नाही, याची कल्पना असल्याने चीनचे फावते आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध महिना उलटूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. चर्चेच्या तीन फेर्‍या झाल्या; पण त्यातून युद्ध थांबण्याच्या दिशेने सकारात्मक तोडगा किंवा वार्ता घडून आलेली नाही. त्यातूनच एकच गोष्ट साधली गेली ती म्हणजे, युक्रेनमधील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी काही काळ युद्धबंदी करून सेफ कॉरिडॉर उपलब्ध करून दिला; मात्र त्यानंतर युद्ध संघर्ष सुरूच असून दिवसेंदिवस ते लांबतच चालले आहे.

फ्रान्स, इस्रायलच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांतूनही काही निष्पन्‍न झाल्याचे दिसले नाही. रशियाच्या तुफानी बॉम्बहल्ल्यांनी, क्षेपणास्त्रांच्या मार्‍याने जवळपास 60 टक्के युक्रेन उद्ध्वस्त झाला. राजधानी कीव्ह बॉम्बहल्ल्यांमुळे 50 टक्क्यांहून अधिक उद्ध्वस्त झाली. असे असतानाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. उलट सोशल मीडियातून भाषणांद्वारे ते रशियाला धमकीवजा इशारे देताना दिसतात. त्यांनी गनिमी कावा पद्धतीने रशियाचा मुकाबला सुरू ठेवला आहे.

युद्ध का लांबले? (Russia-Ukraine war)

हे युद्ध लांबण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, 'नाटो' आणि अमेरिकेकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला शस्त्रपुरवठा. या शस्त्रास्त्र पुरवठ्यामुळे युक्रेनला रशियाशी लढण्यासाठी बळ मिळत आहे. विशेषतः जॅगलीन हे रणगाडे उद्ध्वस्त करणारे क्षेपणास्त्र युक्रेनला पुरवले गेले आहे. युक्रेनच्या प्रतिकारामुळे पुतीन यांच्या सैन्याला हे युद्ध जिंकणे अवघड होऊन बसले आहे. आता ही लढाई पुतीन यांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे तेही माघार घेण्यास तयार नाहीत. अमेरिका आणि 'नाटो'ला हे युद्ध निर्णायक पातळीवर घेऊन जायचे असते, तर कदाचित त्यांनी मोठी किंवा अधिक संहारक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रेही युक्रेनला पुरवली असती. परंतु, रशियाची फार मोठी हानी होणार नाही, अशी शस्त्रास्त्रेच युक्रेनला पुरवली जात आहेत. त्यामुळे हे युद्ध लांबत चालले आहे.

अमेरिकेला काय साधायचे आहे? (Russia-Ukraine war)

येत्या काळात हे युद्ध थांबले, तरी युक्रेन पूर्णपणे बेचिराख झालेला असेल. मग, अमेरिकेने काय साधले? तर, अमेरिकेचा मुख्य हेतू आहे तो रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा. हे युद्ध जितके लांबत जाईल तितका रशियावरील आर्थिक ताण वाढत जाणार आहे. हे युद्ध हायब्रीड युद्ध म्हणून ओळखले जात आहे. कारण, हे युद्ध केवळ रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये नाही. यामध्ये युक्रेनच्या बाजूने नागरिक आणि मर्सेनरीज म्हणजेच परकीय योद्धे लढताहेत. अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी 5000 निर्बंध लावले. रशियाच्या तेलावर, गॅसवर निर्बंध घातले असून युरोपियन राष्ट्रांना यामध्ये सहभागी करण्यासाठी अमेरिका त्यांच्यावर दबाव आणत आहे. यातून रशियाला कंगाल करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत.

युरोप असुरक्षित

या युद्धामुळे युरोप असुरक्षित बनणार आहे. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. युद्धानंतर झेलेन्स्कींना हटवले, तर तो रशियाचा विजय असेल; परंतु तेवढ्यावर पुतीन थांबणार नाहीत. किंबहुना, युक्रेनच्या माध्यमातून रशियाने पोलंड, रुमानिया या देशांना एक संदेश दिला आहे. हे देश पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग होते; परंतु आज ते 'नाटो'चे सदस्य आहेत. येत्या काळात रशिया आणि 'नाटो'मधील संघर्ष वाढणार आहे. त्यामुळे एक प्रकारची असुरक्षितता युरोपमध्ये निर्माण झाली आहे. दुसरे कारण म्हणजे, रशियाकडून 50 टक्के नॅचरल गॅस आणि क्रूड ऑईलचा पुरवठा युरोपियन देशांना होतो. युरोपमधील उद्योग-व्यवसाय तेथील वीजनिर्मिती यावरच अवलंबून आहे. आता त्यामध्ये मोठा व्यत्यय आला. परिणामी, कोरोनामुळे आधीच अडचणीत असलेला युरोप अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे महासत्तास्थान धोक्यात

या युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम भलेही अमेरिका करत असला, तरी संपूर्ण युद्ध काळात अमेरिकेच्या भूमिकेबाबत जगभरातून टीका झाली. किंबहुना, यामुळे अमेरिकेचे महासत्तापद धोक्यात आले आहे. कारण, अमेरिका युक्रेनच्या प्रत्यक्ष मदतीला उतरला नाही. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतले तेव्हाही अमेरिकेवर जगभरातून टीका झाली. आता युक्रेनमुळे अमेरिकेकडून अनेक छोट्या देशांना जी सुरक्षिततेची हमी दिली जायची, त्यावरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

चीनचा फायदा

एकंदरीत पाहता, या युद्धाने युक्रेनला उद्ध्वस्त केले. रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले. युरोपला उसरक्षित बनवले आणि अमेरिकेचा महासत्तेचा दर्जा अस्थिर झाला. मग, प्रश्‍न असा पडतो, तो यातून फायदा कोणाचा झाला? तर, चीनचा! चीनने गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेपुढे स्पर्धात्मक आव्हान उभे केले आहे. किंबहुना, अमेरिकेचा खरा शत्रू चीन आहे. कारण, अमेरिकेच्या हितसंबंधांना मुख्य धोका चीनचाच आहे; पण या युद्धाच्या माध्यमातून अमेरिकेने रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे रशिया आणि चीन अधिक जवळ आले. अमेरिकेचे दोन शत्रू एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढली.

ही बाब बायडेन प्रशासनाच्या लक्षात कशी येत नाही, हा खरा प्रश्‍न आहे. या युद्ध संघर्षामुळे चीनच्या मालाला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यातून चीन एक मोठी आर्थिक सत्ता म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनला विरोध करण्याची ताकद अमेरिकेमध्येही नाही. रशियाप्रमाणे अमेरिका चीनवर आर्थिक निर्बंध लावू शकत नाही. कारण, अमेरिकेच्या मोठ्या गुंतवणुकी चीनमध्ये आहेत. अमेरिकेचा राष्ट्रध्वजही चीनमध्ये तयार होतो. त्यामुळे चीनवर निर्बंध लावल्यास त्यातून अमेरिकाच गोत्यात येऊ शकते.

रशिया आणि अमेरिका यांच्यात फक्‍त 10 टक्के व्यापार आहे; पण चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 700 अब्ज डॉलर्स इतका आहे. त्यामुळेच अमेरिका चीनविरोधात आर्थिक निर्बंधांचे अस्त्र वापरू शकत नाही. याची पुरेपूर कल्पना चीनला असल्याने चीनचे फावते आहे. सारांश, या युद्धाने चीनला सशक्‍त बनवले आहे आणि युरोप, अमेरिका, रशियाला एका चक्रव्यूहात अडकवून आर्थिक समस्यांमध्ये लोटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news