कोल्हापुरात वृद्ध डॉक्टर महिलेची 86 लाखांची फसवणूक | पुढारी

कोल्हापुरात वृद्ध डॉक्टर महिलेची 86 लाखांची फसवणूक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कळंबा (ता. करवीर) परिसरातील वृद्ध डॉक्टर महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत त्यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून 86 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. संबंधित डॉक्टर महिलेने संशयित विष्णू लक्ष्मण पवार (रा. जगतापनगर) याच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

कळंबा रिंगरोडवर डॉक्टर महिला एकट्याच राहतात. त्यांनी आपले घर विक्रीस काढले आहे. संशयित पवारने त्यांना जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील एजंट असल्याचे सांगितले. अनेक खरेदीदार ग्राहक त्यांना भेटवून पवार याने महिलेचा विश्वास संपादन केला. महिला एकट्याच असल्याचा गैरफायदा घेत त्यांच्या आर्थिक उलाढालीचीही त्याने माहिती घेतली. धनादेशांवर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेऊन तसेच एटीएम कॉर्डच्या आधारे बँकांतून परस्पर पैसे काढण्याचा पवार याने सपाटाच लावला. या रकमा काढून पवार याने स्वत:च्या नावे ठेवी केल्या आहेत. दोन-अडीच वर्षांपासून हा प्रकार सुरू होता, असेही वृद्धेने फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button