धुळ्याच्या उपमहापौर पदाची माळ भाजपाचे अनिल नागमोते यांच्या गळ्यात | पुढारी

धुळ्याच्या उपमहापौर पदाची माळ भाजपाचे अनिल नागमोते यांच्या गळ्यात

धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या उपमहापौर पदाची माळ अखेर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अनिल नागमोते यांच्या गळ्यात पडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडाचा इशारा देणारे भाजपाचेच नगरसेवक नागसेन बोरसे यांचे बंड अखेर पेल्यातील वादळ ठरले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे उपमहापौरपदी नागमोते यांची बिनविरोध निवड झाली आहे.

धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता असल्यामुळे महत्त्वाच्या पदावर याच पक्षाच्या नगरसेवकांची निवड झाली आहे. दरम्यान भाजपने उपमहापौरपदासाठी सहा महिन्यांसाठी कार्यकाळ ठरवल्याने मावळते उपमहापौर भगवान गवळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान या पदासाठी नागसेन बोरसे यांची नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच पक्षाने अनिल नागमोते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे बोरसे यांनी सरळ बंडाचा झेंडा हाती घेत महानगरपालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिला.

त्याचप्रमाणे आपल्यास न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याची धमकी देखील त्यांनी दिली. मात्र त्यांचे हे बंड आज पेल्यातील वादळ ठरले आहे. महानगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नागसेन बोरसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याच प्रमाणे अनिल नागमोते यांच्यासमोर कोणताही उमेदवार नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जलज शर्मा यांनी केली.

यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पक्षाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, भाजपाने शहर विकासाच्या कामासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहे. त्यामुळे नवनियुक्त उपमहापौर अनिल नागमोते हे देखील पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर नागसेन बोरसे यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाचे पद असून त्यांनी पक्षाचा आदेश पळून उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती देखील दिली.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : घरातल्‍यांचा जुगनू, कॉमेडीयन आणि ‘आप’चा भगवंत |

Back to top button