नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भाजपमध्ये परिवारवादाचे राजकारण चालणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (दि.१५) मंगळवारी स्वपक्षीय खासदारांना चांगलेच सुनावले. अलीकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना तिकीट देण्यात आले नव्हते, असा उल्लेखही मोदी यांनी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना केला.
पक्षाच्या कोणा नेत्याचे तिकीट जर कापण्यात आले असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगत मोदी पुढे म्हणाले की, भाजपमध्ये वंशवादाला थारा दिला जाणार नाही. आम्ही वंशवादाच्या विरोधात आहोत. परिवारवादी पक्ष देशाला खिळखिळे करीत आहेत.
वंशवादाच्या विरोधात लढा देत असल्यानेच जनता भाजपचे समर्थन करीत आहे. इतर पक्षातील वंशवादाविरोधात लढायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या पक्षातील वंशवादाविरोधात लढावे लागेल.
विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्याच्या कारणांचा तपास करण्याची जबाबदारी खासदारांकडे सोपविण्यात आली आहे. खासदारांकडून अहवाल आल्यानंतर पुढील उचित कार्यवाही केली जाणार आहे.
आंबेडकर भवनात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही पहिलीच बैठक होती. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या तमाम खासदारांनी मोदी यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.
बैठकीच्या सुरुवातीला गानकोकिळा लता मंगेशकर, कर्नाटकमध्ये हत्या झालेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा आणि यूक्रेनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी योजल्या जात असलेल्या उपायांची माहिती मोदी यांनी दिली तर या विषयावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सादरीकरण दिले. बैठकीस गृहमंत्री अमित शहा, सर्बानंद सोनोवाल, प्रह्लादसिंह पटेल, भूपेंद्र यादव, व्ही. मुरलीधरन आदी मंत्र्यासह भाजप संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान काश्मीरमधील पंडितांच्या पलायनावर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'दि काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत कौतुक केल्याचे सूत्रांनी सांगितले. काश्मिरमध्ये हिंदूंवर मोठा अन्याय, अत्याचार करण्यात आला.
सत्य दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. सत्य दाबून टाकण्यासाठी एक इको-सिस्टीम कार्यरत आहे. मात्र चित्रपटाद्वारे हे सत्य समाजासमोर आले गेले. भविष्यात असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.