नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ३७ लाखांचा गंडा ; व्यापाऱ्याचा पोबारा | पुढारी

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ३७ लाखांचा गंडा ; व्यापाऱ्याचा पोबारा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील वडनेरभैरव, खडकजांब परिसरातील ८ ते १० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ३७ लाख रुपयांचा गंडा घालत राजस्थानातील व्यापाऱ्याने पोबारा केल्याची घटना घडली असून, फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांनी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अमोल विजय मोगल (३६) यांच्या फिर्यादीनुसार सरेंद्रसिंह शेय्यावत (राजस्थान) या व्यापाऱ्याने सुरुवातीला उत्तम व्यवहार करत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी शेतकऱ्यांना कोरे धनादेशदेखील दिले. मात्र, प्रत्यक्षात माल दिल्यानंतरही धनादेश बँकेत वटत नसल्याने फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. शेय्यावत याने वडनेरभैरव, खडकजांब येथील ८ ते १० शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या शेतकऱ्यांची झाली फसवणूक

भिका उशीर (४ लाख ७१ हजार ३५०), प्रभाकर जाधव (९ लाख ६७ हजार ४८८), किसन गवळी (१ लाख ६८ हजार २००), कैलास कांडेकर (७ लाख ३० हजार ८००), सुकदेव पगार (२ लाख ७६ हजार ७६६), गोरक्षनाथ उशीर (२ लाख ८३ हजार २००), पंढरीनाथ कांडेकर (२ लाख २१ हजार), अमोल मोगल (२ लाख १७ हजार ३४०), किरण मोगल (३ लाख ६६ हजार) आदी शेतकऱ्यांचे एकूण ३७ लाख २ हजार १४४ रुपयांची फसवणूक झाली आहे.

सतर्क राहण्याचे आवाहन

फसवणूक होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. मात्र, याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. शेख यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button