जळगाव : तीन एकरावरील अफूच्या शेतीचा पर्दाफाश ; चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई | पुढारी

जळगाव : तीन एकरावरील अफूच्या शेतीचा पर्दाफाश ; चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जळगाव पुढारी वृत्तसेवा  : चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारात १ हेक्टर ३० आर म्हणजे तब्बल तीन एकर शेती क्षेत्रात अफूच्या झाडांची लागवड केली गेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी आज कारवाई करीत या शेतीचा पर्दाफाश केला.

या अफूची किंमत अंदाजे करोडोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. या घटनेमुळे अधिकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुडे यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारात अफुची शेती केली जात असल्याची माहिती चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी प्रभारी नायब तहसिलदार देवेंद्र नेतकर, पोउनि अमरसिंग वसावे, पो. कॉ. सुनिल जाधव, सुनिल कोळी, राजु महाजन, भरत नाईक, शशिकांत पारधी, लक्ष्मण शिंगाने इत्यादी पोलिस कर्मचारी पथकासह शेतकरी प्रकाश सुधाकर पाटील यांच्या मालकीच्या शेतात (घटनास्थळी ) गेले.  त्याठिकाणी तीन एकर क्षेत्रात अफूच्या झाडाची लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यावेळी कृषी अधिकारी प्रशांत देसाई यांनाही घटनेची माहिती कळवून बोलविण्यात आले होते. घटनास्थळी पोहचत संबंधित अधिकाऱ्यांचा दिवसभर पंचनामा सुरु होता. या अफूच्या झाडांची प्राथमिक किंमत अंदाजे कोट्यावधींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणादणले आहे. अशाप्रकारची लागवड या परिसरात अन्य कुठे करण्यात आली आहे का? याचा देखील तपास पेलिस विभागातर्फे करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ . प्रवीण मुंडे यांनी भेट दिली असून त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सदर अफूची शेती साधारणत: तीन एकर वर दिसून येत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कूनगर यांना सदर अफूच्या शेतीच्या संदर्भातील माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. शेतकरी प्रकाश पाटील याने प्रतिबंधित अफूची शेतीची लागवड केली असून त्यामुळे सदर शेतकऱ्यावर उचित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल आणि यासंदर्भात कारवाई करणे सुरू झाले असून लवकरात लवकर अजून इतरत्र कुठे अफूची लागवड आहे का? याचा शोध घेण्यात येईल असे मुंडे म्हणाले.

या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यासह खानदेशात अफू व गांजा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाईच्या वेळेस घटनास्थळी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनकर, प्रभारी तहसीलदार देवेंद्र नेतकर, मंडळ अधिकारी आर. आर. महाजन, तलाठी एस. एस. महाजन, पंच एन एस धनराळे व आसिफ शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button