पुणे : सुखसागर, राजीव गांधीनगर भागात राष्ट्रवादीसमोर भाजपचे आव्हान
रवी कोपनर
कात्रज : नव्याने तयार झालेल्या प्रभाग 57 मध्ये मोठ्या सोसायट्या, मध्यमवर्गीय बैठी घरे, कामगार व मजुरांच्या चाळी असा संमिश्र मतदार आहे. या भागात गेल्या दहा वर्षांत सलग राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत, तर भाजपने 2017 मध्ये एका जागेवर निसटता विजय मिळवला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच निवडणुकीचा सामना रंगणार असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे.
मनसेनेही सुरू केली तयारी
जुन्या प्रभाग 38चा बहुतांशी भाग असलेल्या नव्या प्रभाग 57 मध्ये प्रभाग 41, 40 व 37 चा देखील काही भाग जोडण्यात आला आहे. प्रभाग 38 मध्ये राष्ट्रवादी व भाजपचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले होते. नव्याने तयार झालेल्या प्रभाग 57 मध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश कदम व भाजपच्या मनीषा कदम निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तसेच मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी या भागात 2007 ते 2017 असे दहा वर्षे प्रतिनिधित्व केले होते. ते मनसेचा सक्षम पॅनल उभा करण्याच्या तयारीत आहेत. या प्रभागात मोठ्या सोसायट्या, बैठ्या चाळी व कामगार वस्तीत राष्ट्रवादीची ताकद आहे तर सोसायट्या व जुन्या प्रभाग 41 मध्ये भाजपला मानणारा वर्ग आहे. तसेच, शिवसेना व मनसेने नागरी संपर्क ठेवला आहे.
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश कदम, प्रतीक कदम, भारती कदम, सुधीर डावखर, ओंकार घाटे, गणेश मोहिते, उदयसिंह मुळीक इच्छुक आहेत. भाजपकडून मनीषा कदम, विनय कदम, नितीन राख, दीपक पालवे, अनिल मेमाणे, विकास लवटे, अजय भोकरे आदी इच्छुक आहे. शिवसेनेच्या वतीने बळीराम निंबाळकर हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून सचिन कदम, रेखा कदम, मनसेकडून मंगेश रासकर, तनुजा रासकर तसेच शिवालय प्रतिष्ठानचे योगेश शेलार, निलेश वणवे, अक्षय कोंढाळकर हे इच्छुक आहेत.
प्रबळ दावेदार असलेल्या राष्ट्रवादी व भाजपमध्ये उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असून, दोन्ही पक्षाला उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नव्या प्रभाग 57 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यामध्ये सरळ लढतीचे चित्र दिसत असले तरी शिवसेना, मनसे व काँग्रेसदेखील ताकतीने मैदानात उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत.
अशी आहे प्रभागरचना
भारतनगर, जाधवनगर, उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, राजस सोसायटी, सुखसागरनगर भाग 1 व 2, साईनगर, कासट चाळ, राजीव गांधीनगर, अप्पर पोलिस चौकी परिसर, स्टेट बँक कॉलनी ते बिबवेवाडी पोलिस स्टेशन भाग हा भाग मिळून नव्या प्रभाग 57 ची रचना करण्यात आली आहे.
एकूण-लोकसंख्या : 55971
अनुसूचित जाती : 5651
अनुसूचित जमाती : 527

