जळगावी परीक्षा कमळ, धनुष्यबाण, घड्याळाची! लढाई मिनी मंत्रालयाची | पुढारी

जळगावी परीक्षा कमळ, धनुष्यबाण, घड्याळाची! लढाई मिनी मंत्रालयाची

जळगाव : नरेंद्र पाटील  : मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेची ओळख असून, या जिल्हा परिषदेवर आजपर्यंत शिवसेना-भाजप यांचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेसची बैसाखी घेऊन भाजपने एक हाती सत्ता स्थापन केली आहे. या सत्तेमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघातील गटाचे वर्चस्व राहिले आहे. याच लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य भाजपाचे जिंकलेले आहेत. मात्र, यावेळेस होणार्‍या निवडणुकीत ही शक्यता फार कमी दिसत आहे. एकनाथ खडसे व गिरीश महाजन एकत्र असताना रावेर मतदारसंघात सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य जिंकणे शक्य होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्यामुळे खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत आल्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या सदस्य संख्येत नक्कीच कमतरता येईल यात काही शंका नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ यांची परीक्षा राहणार असून, चुरशीची लढत पाहावयास मिळेल हे मात्र खरे.

मिनी मंत्रालयावर आजपर्यंत कधी धनुष्यबाणाच्या मदतीने कमळाने सत्ता गाजवलेली आहे. यात सर्वांत महत्त्वाचे होते ते म्हणजे एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे दोन्ही नेते. मात्र, गेल्या तीन वर्षांत राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे जिल्ह्यातील राजकारणामध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे 22 सदस्य जिंकायचे तसेच राष्ट्रवादीचे 6, सेनेचे 2 व काँग्रेसचे 4 असे विद्यमान बलाबल आहे. मात्र, यंदा खडसे व महाजन यांच्यात फूट पडल्याने याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. तर दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे किती जोर लावणार त्यावरही बरीचशी गणिते अवलंबून आहेत, शिवसेना निश्चितच आपल्या जागा दोनवरून अधिक करण्यासाठी प्रयत्न करणार यात काही शंका नाही. तर रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी हेसुद्धा आपल्या काँग्रेसच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. आ. संजय सावकारे यांची मात्र कोंडी होण्याची शक्यता आहेत. कारण भाजपत खडसे यांचे बोट धरून आले आणि आता त्यांच्या विरोधात मैदानात उभे राहावे लागणार आहे त्यात आ. गिरीश महाजन यांनासुद्धा आपल्या मतदारसंघासह जिल्ह्यात चमत्कार करून दाखवावा लागणार. नाहीतर ‘संकटमोचक’ फक्त नावालाच ठरण्याची वेळ येऊ शकते.

जळगाव लोकसभा मतदारसंघात सेनेचा बोलबाला आहे. सेना 12, भाजप 11, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 0 असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या जागा वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. या पाठोपाठ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस ही आपली ताकद वाढवण्यासाठी मैदानात राहतील. मात्र, जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे 4 आमदार आहेत. भाजपची जरी एक हाती सत्ता जिल्हा परिषदेवर असली तरी याला टेकू मात्र काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपला सहकार्य केल्यामुळे भाजपची सत्ता आजपर्यंत टिकून राहिली आहे.

लवकरच निवडणुकांच्या घोषणा व नवीन गटांची रचना होणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 67 वरून 77 होणार आहे आणि यात 50 टक्के महिला आरक्षण असल्यामुळे अर्धे तिकीट हे पतीदेवांचे राहणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जर महाविकास आघाडी झाली नाही तर मिनी मंत्रालयाच्या लढाईत कमळ, घड्याळ व धनुष्यबाण यांची कसोटी लागणार यात काहीही शंका नाही.

हेही वाचा :

Back to top button