एक आठवण ‘दत्तक नाशिक’ची! | पुढारी

एक आठवण ‘दत्तक नाशिक’ची!

मी नागपूरचा आहे. पण, नागपूर सांभाळण्यासाठी नितीन गडकरी खंबीर आहेत. मी नाशिकला दत्तक घेत असून, या शहराचा चेहरामोहरा बदलेन, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री अन् विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली अन् नाशिक महापालिकेच्या 30 वर्षांच्या इतिहासात प्रथमच नाशिककरांनी एका पक्षाला म्हणजेच भाजपला स्पष्ट बहुमताने सत्ता दिली. महापौर अन् उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे आली, तशी विकासकामांबाबतची नाशिककरांची अपेक्षाही वाढत गेली. विरोधकांना मात्र ‘दत्तक नाशिक’ घोषणेचे आयतेच कोलीत मिळाल्याने, त्यांच्याकडून वेळोवेळी भाजपला या घोषणेची आठवण करून दिली गेली. आगामी निवडणुकीतही ‘दत्तक नाशिक’ घोषणेवरून भाजपला कोंडीत पकडले जाईल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. असो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि.21) नाशिकमध्ये येत असून, त्यानिमित्त हा शब्दप्रपंच…

18 फेब्रुवारी 2017 रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या प्रचार सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दत्तक नाशिक’ची घोषणा केल्यानंतर नाशिकचा विकास केव्हा होईल? याबाबतचे काउंटडाउन सुरू झाले. घोषणेच्या वर्षपूर्तीचा आढावा घेताना, नाशिककरांच्या पदरी नक्की काय पडले, याचाही लेखाजोखा मांडला गेला. सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कुरघोडीने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका विरोधकांनी केली. या निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीर केलेल्या ध्येयनाम्यातील एकही बाब वर्षभरात अमलात आली नसल्याची टीकाही विरोधकांकडून केली गेली. नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली. परंतु, वर्षभरात निराशाच पदरी पडल्याची विरोधकांनी मांडणी केली. आपापसातील भांडणानेच नाशिककरांचे मनोरंजन झाले, अशा टीकांनी या घोषणेची वर्षपूर्ती साजरी केली गेली. मात्र, यात अर्थातच पक्षीय राजकारण असल्याचे स्पष्ट आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला जे जमले नाही, ते भाजपने ‘करून दाखवले’ याबद्दलची असूया अन्य पक्षांना अजूनही वाटत असल्याचाही एक कंगोरा या प्रकरणाला आहे, हे नाकारून चालणार नाही.

आज फडणवीसांच्या त्या घोषणेला पाच वर्षे झाली; मात्र अधूनमधून नाशिकला येणार्‍या नेतेमंडळींकडून या घोषणेचा खरपूस समाचार घेणे थांबलेले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत या घोषणेचा समाचार घेतला होता. ‘एकदा पालकत्व घेतल्यानंतर ते असं मध्येच सोडायचं नसतं.’ अशी सल्लावजा टीका काँग्रेसने केली होती. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन दुर्घटनेनंतर 10 दिवसांनी फडणवीस यांनी नाशिकला भेट दिल्याचाही विषयही विरोधकांना चांगलाच पुरला. ‘दत्तक पित्याला उशिरा का होईना, नाशिकची आठवण झाली. किमान देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून नाशिकला लस, रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घ्यावा’, अशी टीकात्मक अपेक्षा शिवसेनेकडून त्यावेळी व्यक्त केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दत्तक नाशिकच्या घोषणेची खिल्ली उडवत भाजपचे चांगलेच वाभाडे काढले.

आता 2022 च्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असताना, भाजप सत्ता राखण्यास उत्सुक आहे. गेल्या वेळी नाशिक दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर नाशिककरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र, शहर बससेवेचा प्रकल्प वगळता, ठोस कामे दिसून येत नसल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. दुसरीकडे, सिटी लिंकसह चांगल्या रस्त्यांच्या कामाची शिदोरी आपल्याला याही निवडणुकीत तारून नेईल, यावर भाजपचा विश्वास आहे. मात्र, अंतर्गत गटबाजी अन् नेत्यांमधील कंपूशाहीचे आव्हान भाजपसमोर असल्याचे उघडच आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीला भाजप कशा पद्धतीने सामोरे जातो, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यकर्ता मेळाव्यात सत्ता राखण्यासाठी कोणत्या टिप्स मिळतात, याचीही उत्सुकता आहे.

प्रासंगिक – सतीश डोंगरे

हेही वाचा :

Back to top button