नाशिक : जिल्ह्यात 53 दिवसांत 61 हजार 567 कोरोनाबाधित | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात 53 दिवसांत 61 हजार 567 कोरोनाबाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 27 डिसेंबर 2021 पासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, कोरोना प्रतिबंधक लशीचा प्रभाव, रोग प्रतिकारकशक्ती वाढल्याने कोरोनाचा धोका कमी झाला. 27 डिसेंबर 2021 ते 18 फेब्रुवारी 2022 या 53 दिवसांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 61 हजार 567 कोरोनाबाधित आढळून आलेत. याच कालावधीत 134 बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव जिल्ह्यात कमी झालेला पाहावयास मिळाला. दुसरी लाट ओसरल्यानंतर दि. 27 डिसेंबर 2021 पासून जिल्ह्यात कोरोनामुक्त होणार्‍यांपेक्षा कोरोनाबाधित जास्त आढळून येण्यास सुरुवात झाली. त्यातच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील पहिल्या ओमायक्रॉनबाधिताची ओळख पटल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, ओमायक्रॉनचा कमी असलेला धोका व कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्याने तसेच अनेकांच्या रोग प्रतिकारशक्तीत वाढ झाल्याने कोरोनाचा धोका कमी पाहावयास मिळाला. या 53 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात दोन लाख 72 हजार 649 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 61 हजार 567 जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी शहरात 39 हजार 722, ग्रामीण भागात 18 हजार 438, मालेगावमध्ये एक हजार 165 व परजिल्ह्यातील दोन हजार 242 बाधित आढळून आले. याच कालावधीत शहरातील 39 हजार 727 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ग्रामीण भागातील 17 हजार 775, मालेगावमधील एक हजार 158 व परजिल्ह्यातील दोन हजार 212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे गत 53 दिवसांत शहरात 74, ग्रामीणमध्ये 54 व मालेगावमधील सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सरासरी पाच हजार संशयितांची चाचणी
जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले होते. 27 डिसेंबर ते 18 फेब—ुवारी या कालावधीत दोन लाख 72 हजार 649 संशयितांच्या चाचण्यात करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात दररोज सरासरी पाच हजार 144 चाचण्या केल्या. त्यापैकी सरासरी एक हजार 161 कोरोनाबाधित आढळून आले.

हेही वाचा :

Back to top button