ठाणे : समीर वानखेडेंना तगडा झटका; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल | पुढारी

ठाणे : समीर वानखेडेंना तगडा झटका; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा झटका दिला आहे. त्यांच्या नावे नवी मुंबईत असलेला हॉटेल सदगुरु बार आणि रेस्टॉरंटचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. त्यानंतर आता वानखेडे यांच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून  कारणे दाखवा नोटीस बाजवल्या नंतर कारवाई केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर हॉटेल सदगुरु बार आणि रेस्टॉरंटचा परवाना आहे. या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच भारतीय बनावटीची विदेशी मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच मुखत्यारपत्र वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केल्याचा खुलासा समीर वानखेडेंनी यापूर्वीच केले होते. दरम्यान, या बारला राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या बारचा परवाना रद्द केले आहे.

समीर वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच, वयामध्ये विसंगती असल्याचे कारण देण्यात आले आहे. ज्यावेळी परवाना मिळाला त्यावेळी वानखेडेंचे वय हे अवघे 17 वर्षांचे होते. त्यामुळे सतराव्या वर्षी वानखेडेंना बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणी चौकशी करीत होते. उत्पादन शुल्क विभागाने ठाणे प्रशासनाकडे आपला अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बार परवाना रद्द करण्याचे आदेश काढले होते. दरम्यान, वाशी येथील सतगुरु हॉटेल्सच्या लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने काही त्रुटी आढळल्या प्रकरणी नवी मुंबईत वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून आता या गुन्ह्याचा तपास कोपरी पोलीस करणार आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button