नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 03 मध्ये उमेदवार संख्येचा समतोल राखण्याचे आव्हान | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 03 मध्ये उमेदवार संख्येचा समतोल राखण्याचे आव्हान

पंचवटी : रवींद्र आखाडे : नव्या रचनेत जुन्या 1, 2 आणि 3 या प्रभागांमधील काही भाग समाविष्ट करून तयार झालेला नवीन प्रभाग क्रमांक 3 हा भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा प्रभाग ठरलेला आहे. मुख्यतः हा प्रभाग यापूर्वीचा प्रभाग क्रमांक 2 आहे.

गेल्या निवडणुकीत या प्रभागातून माजी स्थायी सभापती उद्धव निमसे, माजी प्रभाग सभापती शीतल माळोदे, सुरेश खेताडे आणि पूनम सोनवणे या भाजपच्या नगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिले आहे. मात्र, नव्या रचनेत या प्रभागाची मोडतोड होऊन नांदूर-मानूरसह विडी कामगारनगर असा काही महत्त्वाचा भाग वगळण्यात आला आहे. त्यामुळे नव्या प्रभाग 3 मध्ये या चार विद्यमान नगरसेवकांपैकी केवळ एकट्या शीतल माळोदे या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. तर उर्वरित तिन्ही उमेदवार अन्य प्रभागातून इच्छुक आहेत. त्यामुळे माळोदे यांना नवख्या उमेदवारांना सोबत घेऊन पॅनल तयार करावे लागणार आहे. पंचवार्षिकचा अनुभव आणि केलेल्या कामांच्या जोरावर माळोदे यांना निवडून येण्यासाठी कस लावावा लागणार आहे. सर्वाधिक मतदान असलेल्या आडगावातून इच्छुक अधिक आहेत. यामुळे पॅनल तयार करताना प्रत्येक पक्षासमोर प्रामुख्याने आडगावातील उमेदवार संख्येचा समतोल राखण्याचे आव्हान राहणार आहे.

प्रमुख इच्छुक उमेदवार
भाजप : शीतल माळोदे, अ‍ॅड. कैलास शिंदे, गणेश माळोदे, राम संधान, प्रभाकर माळोदे, नामदेव शिंदे, विलास शिंदे, विद्या शिंदे. शिवसेना : मल्हारी मते, संदीप लभडे, सुनील जाधव, बाळासाहेब उखाडे, विनोद हटकर, पोपट शिंदे, सुरेश मते, सिद्धेश अंडे.
मनसे : गणेश मंडलिक, सोमनाथ वडजे.
राष्ट्रवादी काँग्रेस : अतुल मते.
बहुजन समाज पार्टी : सचिन जाधव.
काँग्रेस : विश्वास मोराडे.
इतर : गणेश चव्हाण, रोहिणी उखाडे.

व्यूहरचना आखावी लागणार
भाजपसह मनसे व राष्ट्रवादीला तसेच शेकापला या आधी या भागातून यश मिळालेले आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही. शेकापचे माजी नगरसेवक जे. टी. शिंदे यंदा निवडणूक रिंगणात नसले तरी त्यांच्या नव्या पिढीतील एक उमेदवार रिंगणात राहणार आहे. मात्र, त्यांची मनवी पिढी नवा पक्ष असेही होऊ शकते.

असा आहे प्रभाग : म्हसरूळ गावठाण व मळे परिसर, वैदुवाडी, गजपंथ सोसायटी, आडगाव गावठाण व मळे परिसर, मेडिकल कॉलेज, एमईटी कॉलेज, कोणार्कनगर, जत्रा हॉटेल, निशांत व्हिलेज, सागर व्हिलेज, शरयू पार्क, ग्रामीण पोलिस वसाहत.

नागरिक म्हणतात…

विद्यमान लोकप्रतिनिधींनीही प्रभागात चांगली कामे केली. भावी लोकप्रतिनिधींनीकडूनही चांगल्या कामांची अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी कार्यक्षम, पारदर्शी असावा.
– मधुकर जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी

आजवरच्या निवडणुकांचा विचार केल्यास गेल्या पंचवार्षिकला प्रभागात बहुसंख्य कामे झाली आहेत. मळे परिसरातील रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी भावी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा.
– संजय शिंदे, शेतकरी, आडगाव

आडगाव परिसरात आयटी पार्क, लॉगिस्टिक पार्क होण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. शेतकर्‍यांच्या जमिनी आरक्षित केल्या जातात, त्यांना चांगला मोबदल्ण्यासाठी पाठपुरावा करावा. – उमेश माळोदे, उद्योजकमनपाने

आडगावमध्ये ई-स्मार्ट स्कूल उभारण्याची गरज आहे. मनपा शाळेची इमारतही सुसज्ज करून पुरेशी कर्मचारीसंख्या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भावी लोकप्रतिनिधींकडून हीच अपेक्षा.
– अशोक माळोदे, स्थानिक रहिवासी

हेही वाचा ;

Back to top button