मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (मंगळवार) मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर शिवसेना आज पत्रकार परिषद घेणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनीही ही प्रेस कॉन्फरन्स ऐकावी, असं आवाहन राऊतांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर या छाप्यांना विशेष महत्त्व आहे. मुंबईतील सुमारे दहा ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलमा अंतर्गत ही कारवाई केली जात आहे.
ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले आहेत. एका राजकीय नेत्याशी संबंधित ठिकाणांवरही ही धाड सुरु असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकत्याच दाखल केलेल्या एफआयआर आणि गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीची कारवाई सुरु असल्याचंही सांगितलं जात आहे.
राज्यात झालेले मोठे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे आणि भ्रष्टाचारांशी संबंधित तक्रारीवरुन सध्या ईडी, सीबीआय, एनआयए, एनसीबी अशा केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील दिग्गज नेते मंडळी, मंत्री आणि आमदार यांची चौकशी करत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे साडे तीन जण गजाआड जातील असा इशारा देत, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मंगळवारी सकाळपासून दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापेसत्र सुरू केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले आहेत.