भाजपला कानोसा लागू न देता एमएनजीएलने उरकला कार्यक्रम, गॅसजोडणीस प्रारंभ | पुढारी

भाजपला कानोसा लागू न देता एमएनजीएलने उरकला कार्यक्रम, गॅसजोडणीस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामे आणि प्रकल्प समोर आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून होत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने (एमएनजीएल) भाजपला कानोसा न लागू देता परस्पर औद्योगिक व घरगुती गॅसजोडणीचा शुभारंभ केला. यामुळे भाजपचा हिरमोड झाल्याने कंपनीविषयी दिल्लीत तक्रार करण्यात येणार आहे. ही वार्ता समजताच कंपनीने सावरासावर करत प्रायोगिक तत्त्वावरच जोडणी देण्यात आल्याचे सांगून उद्घाटनाचा कार्यक्रम नंतर होणार असल्याचे सांगितले आहे.

नाशिक शहरात पाइपलाइनच्या माध्यमातून घराघरांत तसेच औद्योगिक वसाहतीत लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) देण्यासाठी एमएनजीएल प्रकल्प सुरू करत आहे. पाइपलाइन टाकण्याकरिता कंपनीने मनपाच्या परवानगीने शहरात 150 किमीचे रस्ते खोदण्याचे काम केले जात आहे. त्यापैकी जवळपास 100 किमीचे काम पूर्ण झाले आहे. नॅचरल गॅस प्रकल्पाकरिता आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टॅण्ड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका या चार ठिकाणी स्टेशन उभारले जात आहेत. चारपैकी विल्होळी नाका येथील गॅस फिलिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. घरगुती गॅस पाइपलाइनचे काम अंतिम चरणात असून, गॅसचा पुरवठ्याचे काम सुरू झाले आहे.
पहिल्या घरगुती गॅस (पीएनजी) जोडणी अंबड-सातपूर लिंक रोडवरील डायमंड रेसिडेन्सीमध्ये तर मेसर्स नारखेडे स्वीच गिअर कंपनीला लिक्विफाइड नॅचरल गॅसची (एलपीजी) जोडणी देण्यात आली आहे.

भाजपही कंपनीला प्रत्युत्तर देणार
एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सावंत व नाशिकचे संदीप श्रीवास्तव यांच्या हस्ते जोडणीचा कार्यक्रम झाला. परंतु, या कार्यक्रमाला मनपातील सत्ताधारी भाजपच्या एकाही नेत्यास निमंत्रित न केल्याने सत्ताधारी भाजपमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पाइपलाइनकरिता रस्ते खोदकाम करताना भाजप नगरसेवकांनी अडथळे आणल्याने कंपनीने जोडणीचा प्रारंभ करताना त्याचे उट्टे काढल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे यानंतरच्या रस्ते खोदकामावेळी कंपनीला धडा शिकविण्यासाठी भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button