अनोखा उपक्रम! इथे होते एक रुपयात लग्न, सोबत गादी, पलंग, फ्रीज, कुलरचा आहेरही… | पुढारी

अनोखा उपक्रम! इथे होते एक रुपयात लग्न, सोबत गादी, पलंग, फ्रीज, कुलरचा आहेरही...

धुळे : पुढारी वृत्तसेवा : विवाह सोहळा म्हटला म्हणजे लाखो रुपयांचा खर्च पाहता वधू आणि वर यांच्या माता पित्याची दमछाक होते. अशा खर्चिक सोहळ्याला फाटा देत असतानाच दोंडाईचा येथे गरीब नवाज वेल्फेअर संस्थेच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू पिंजारी यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून वधू आणि वर पित्याकडून अवघा एक रुपया घेऊन ते विवाह सोहळा पार पाडत आहेत. या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला संसार उपयोगी साहित्य देखील दिले जाते. अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूस निमित्ताने धुळे जिल्ह्यात हा विवाह सोहळा पार पाडला जातो.

दोंडाईचा येथील गौसिया नगरात हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. या विवाह सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, सरकार साहेब रावल, अमित पाटील, राम रघूवंशी, जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर भांमरे, प्रविण महाजन, जितेंद्र गिरासे, वसिम पिंजारी, इस्माइल पिंजारी, दानिश पिंजारी, नाजीम पिंजारी, अहमद पिंजारी, अक्रमभाई अन्सारी, सुफियान तडवी, सलीम मेमन, मुख्तार पठाण, शकील खाटीक, मुख्तार खाटीक, अय्युब खाटीक, रफिक शाह आदींनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यात 12 जोडपी विवाह बंधनात अडकली. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या प्रत्येक जोडप्याची शंभर वऱ्हाडी तसेच विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला अल्पोपहार आणि जेवणाची देखील व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली. गरीब नवाज वेल्फेअरचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू हाजी बशिर पिंजारी यांच्यातर्फे प्रत्येक जोडप्याला गादी, पलंग, फ्रिज, कपाट, कूलर, गॅस कनेक्शन व २५ संसारोपयोगी भांडी देण्यात आले.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना हाजी नबू शेठ पिंजारी यांनी सांगितले की, अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने दोंडाईचा येथे गेल्या पंधरा वर्षांपासून आपण हा उपक्रम राबवत आहोत. समाजातील गरीब परिवारातील वधू-वरांचा अवघ्या एका रुपयांमध्ये विवाह लावून देण्याच्या या उपक्रमामुळे अशा परिवारांना मदतीचा हात मिळतो. धार्मिक उत्सवाबरोबरच या सामाजिक कामाचे आयोजन वेल्फेअर संस्थेच्या वतीने केले जाते. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. या विवाह सोहळ्यासाठी आधी जनजागृती केली जाते. पुढील वर्षी देखील जानेवारी महिन्यामध्ये असाच विवाह सोहळा पार पडणार असल्याने गरजू वधू-वरांनी या विवाह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button