सुप्रीम कोर्टात पोहोचले कर्नाटकातील हिजाब प्रकरण, तत्काळ सुनावणीस नकार | पुढारी

सुप्रीम कोर्टात पोहोचले कर्नाटकातील हिजाब प्रकरण, तत्काळ सुनावणीस नकार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हिजाब प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यावर याचिका दाखल करून घेण्याबाबत विचार करता येईल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली. कर्नाटकात मुलींवर दगडफेक करण्यात आली. राज्यात शाळा-महाविद्यालये बंद पडली आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सुरु असलेला खटला आपल्याकडे वर्ग करावा, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.

तूर्तास हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उच्च न्यायालय यावर फैसला करु दे, असेही रमणा यांनी स्पष्ट केले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग केले जावे, असे सिब्बल यांनी सांगितले. हिजाब प्रकरण देशभरात पसरत असल्याने त्यावर सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी घेतली जावी, हे सिब्बल यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तसेच सुनावणीसाठी तारीख देण्यास सरन्यायाधीश रमणा यांनी नकार दिला.

कर्नाटकात हिजाबवरून सुरू झालेला संघर्ष इतका विकोपाला गेला की, सरकारला तीन दिवस सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवावी लागली. कर्नाटकातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये हिजाब विरोधी आणि समर्थक समोरासमोर भिडले आहेत. हा वाद कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यासहीत अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पसरला आहे. काही ठिकाणी हिंसेचाही वापर आंदोलकांकडून झालेला आहे. दरम्यान, हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे सोपवले आहे.

हे ही वाचा :

Back to top button