नाशिक : अंबड पोलिसांच्या रडारवर 16 गुंड ; 21 तडीपार | पुढारी

नाशिक : अंबड पोलिसांच्या रडारवर 16 गुंड ; 21 तडीपार

सिडको : पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी अंबड पोलिसांनी नियोजन सुरू केले असून, यात रडारवर गुन्हेगार आले आहेत. सिडकोत जानेवारी महिन्यात तब्बल 21 गुन्हेगारांना तडीपार केल्यानंतर 16 गुंडांवर कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलिस आयुक्तालय कार्यालयात पाठविला आहे. सध्या पाच जणांची चौकशी सुरू असून, त्यांचाही तडीपारीचा प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली. एकूण तडीपार संख्या 41 आहे. या शिवाय काही गुन्हेगारांना रसद पुरविणे व अभय देणार्‍या काही राजकीय नेत्यांचीही चौकशी केली जाणार असल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

महापालिकेची निवडणूक दोन-तीन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या पाश्वभूमीवर अंबड पोलिसांनी कंबर कसली आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. त्यात अंबड पोलिस ठाणे हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पोलिसांनी आतापासूनच नियोजन सुरू केले असून, अनेक गुंड पोलिसांच्या रडारवर आहेत. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, छोट्या – मोठ्या गुंड प्रवृत्तीतून भाईगिरी करणारे अशा सर्वांवरच कारवाई सुरू आहे.

पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त सोईल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांची संपूर्ण टीम ही कारवाई करीत आहे. अंबड पोलिसांनी मनपाच्या गेल्या दोन निवडणुकांत म्हणजे दहा वर्षांपूर्वीचे गुन्हेगार रेकार्ड काढून तपासणी केली.
त्यात निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवू शकतील, अशा गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांची चौकशी सुरू केली. यात डिसेंबर महिन्यात 21 गुंडांचा प्रस्ताव तयार करून पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्या प्रस्तावांची सुनावणी घेत 21 जणांना तडीपार करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, या 21 जणांना तडीपार केले आहे.

यानंतर अंबड पोलिसांनी 16 जणांचा तडीपार प्रस्ताव तयार करून पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविले आहेत. त्या 16 जणांची सुनावणी सुरू आहे. त्यानंतर अंबड पोलिसांनी पुन्हा 5 जणांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या 5 जणांचा तडीपार प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

टवाळखोरांवर पोलिसांकडून कारवाई
सिडकोत रस्त्यावर अथवा उद्यानामध्ये टवाळखोरी करणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक दररोज सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत रस्त्यावर अथवा उद्यानांमध्ये नागरिक, महिला, युवतींना त्रास देणा-या टवाळखोरांवर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button