लोणावळा : ओडिशा राज्यातील अपहृत मुलीची सुटका | पुढारी

लोणावळा : ओडिशा राज्यातील अपहृत मुलीची सुटका

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा

ओडिशा राज्यातून अपहरण करण्यात आलेल्या एका १७ वर्षीय पीडित मुलीची नवलाख उंबरे (ता. मावळ) येथून सहीसलामत सुटका करण्यात आली. ही कौतुकास्पद कामगिरी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. ६ फेब्रुवारी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांना या अपहरण झालेल्या मुलीबद्दल कळवले. ओडिशा येथील सिमुलीया पोलीस ठाणे याठिकाणी अपहरण झालेली १७ वर्षीय पीडित मुलगी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवलाख उंबरे येथे एका खोलीत बंदीस्त आहे. तिला मदत करून तिला ताब्यात घ्या.

या आदेशानुसार पो. नि. प्रविण मोरे यांनी पो.उप.नि. सचिन बनकर, सहा. पो. फौजदार बोकड, पो. हवा. जांभळे, महिला पो. हवा. घुगे यांचे पथक तयार केले. त्यांना योग्य मार्गदर्शन करून समन्वय साधून तत्काळ रवाना केले. सदर पथकाने मोबाईल टॉवर लोकशेनच्या आधारावर नवलाख उंबरे येथे पोहचून तेथील स्थानिकांचे मदतीने पीडित मुलीचा शोध घेतला. एका बंद खोलीतून तिला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकाराबाबत स्थानिक पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी तळेगांव दाभाडे यांना माहिती दिली.

पोलीस अधिक्षक देशमुख, पोलीस उप अधीक्षक घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीडित मुलीला बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. सध्या तिला चैतन्य महिला आश्रम, मोशी याठिकाणी सुखरूप ठेवण्यात आले आहे. सदरची माहिती ओडिशा येथील संबंधित पोलिस ठाण्यात कळविण्यात आले आहे.

Back to top button