नाशिक : किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा वेग मंदावला ; कोव्हॅक्सिनचा पुरवठाच नाही | पुढारी

नाशिक : किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा वेग मंदावला ; कोव्हॅक्सिनचा पुरवठाच नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारकडून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत नसल्याने नाशिक शहरातील 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. शहरात आतापर्यंत 52 हजार 200 मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला असून, पहिल्या डोसला महिना पूर्ण झाल्याने शाळांकडून दुसर्‍या डोससाठी विचारणा केली जात आहे. सध्या मनपाकडे अवघ्या दीड हजार लशी शिल्लक आहेत.

15 ते 18 वयोगटातील सुमारे 1 लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट मनपाला देण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत 52 हजार मुलांचे लसीकरण पूर्ण होऊन अद्याप 48 हजार मुलांचे लसीकरण बाकी आहे. यामुळे एकीकडे 48 हजार मुलांचा पहिला डोस, तर दुसरीकडे पहिला डोस घेतलेल्या मुलांना दुसरा डोस द्यावा लागणार असल्याने लस उपलब्धतेवरून मनपाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध करून देण्याबाबत मनपाच्या वैद्यकीय विभागाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला पत्र पाठविले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीने 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत लसीकरणाला चांगलाच वेग आला होता. मंगळवार (दि. 2)पर्यंत शहरात 52 हजार 200 मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या मनपाकडे 1495 लशींचे डोस शिल्लक आहेत. कोव्हॅक्सिनचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणाबाबत अडचण निर्माण झाली आहे.

21 हजार जणांना बूस्टर डोस
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 10 जानेवारीपासून शहरातील 138 लसीकरण केंद्रांवर आरोग्य-वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाइऩ वर्कर्सना बूस्टर डोस दिले जात आहेत. शहरात फ्रंटलाइऩ वर्कर्सची संख्या 25 हजार असून, आतापर्यंत 21 हजार 50 जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button