गोवा निवडणूक : उमेदवारांकडे आलिशान चारचाकींची मांदियाळी | पुढारी

गोवा निवडणूक : उमेदवारांकडे आलिशान चारचाकींची मांदियाळी

पणजी : पिनाक कल्लोळी

राज्यात गाड्यांचे वेड हा नवीन विषय नाही. बहुतेक घरात किमान एक चारचाकी आणि दोन दुचाकी असतात. चारचाकी गाड्या या गरजेपेक्षा ‘स्टेस्टस सिम्बॉल’ म्हणून जनमानसात रूढ झाल्या आहेत. राज्यातील काही नेत्यानांही आलिशान आणि महागड्या गाड्यांची हौस आहे. यामध्ये माजी मंत्री मिकी पाशेको यांचा क्रमांक प्रथम लागतो. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रचाराच्या सात आलिशान गाड्या आहेत. यामध्ये हार्ले डेव्हिडसन बाईक, मर्सिडीझ बेंझ सी 200, हमर एच 3, बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ सी 200 यांचा समावेश आहे. (गोवा निवडणूक)

नीलेश काब्राल यांच्याकडे सर्वाधिक 41 गाड्या असल्या, तरी यामध्ये आलिशान गाड्या नाहीत. त्यांच्याकडे प्रामुख्याने टँकर, टिप्पर, ट्रक अशाच गाड्या आहेत. यात दोन बार्जचाही समावेश आहे. कळंगुट मतदारसंघातील उमेदवार अँथोनी मिनेझीझ यांच्याकडे सहा गाड्या आहेत. त्यात हमर एच 3, मर्सिडीझ बेंझ इ 250, लँड रोव्हर, रेंज रोव्हर आदींचा समावेश आहे. मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांच्याकडे 21 गाड्या आहेत. त्यात रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू मिनी कूपर या आलिशान गाड्या आहेत. पणजीचे बाबूश आणि जेनिफर मोन्सेरात कुटुंबीयांकडे एकूण 16 गाड्या आहेत. त्यामध्ये मर्सिडीझ सी, मर्सिडीझ 350 डी, बीएमडब्ल्यू 325 यांचा समावेश आहे. विजय सरदेसाई यांच्याकडे एकूण चार गाड्या असून त्यात जॅग्वार गाडीचा समावेश आहे. (गोवा निवडणूक)

म्हापशाचे जोशुआ डिसोझा यांच्याकडे एकूण सहा गाड्या असून, त्यात डुकाटी या स्पोर्टस बाईकचा समावेश आहे. हळदोेणेचे ग्लेन टिकलो यांच्याकडे बीएमडब्ल्यू 530 या आलिशान गाडीसह एकूण 14 गाड्या आहेत. कुडतरीचे उमेदवार डॉमनिक गावकर यांच्याकडे बीएमडब्ल्यूसह 14 गाड्या आहेत. नुवेचे राजू काब्राल बीएमडब्ल्यू 530 डीसह एकूण 17 गाड्या आहेत. दीपक ढवळीकर यांच्याकडेही बीएमडब्ल्यू ही आलिशान गाडी आहे. केपेच्या एल्टन डिकॉस्ता यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ , बेंझ सीएलए 200 या आलिशान गाड्या आहेत. पर्वरीचे संदीप वरझकर आणि विकास प्रभुदेसाई, नावेलीचे आवेर्तान फुर्तादो, पेडण्याचे प्रवीण आर्लेकर यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ गाड्या आहेत. सांताक्रूझचे रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स सहा, ताळगावच्या टोनी रॉड्रिग्ज यांच्याकडे बीएमडब्ल्यू 320 डी तर वेळ्ळीच्या सावियो डिसिल्वा यांच्याकडेही बीएमडब्ल्यू गाडी आहे. (गोवा निवडणूक)

पाच लाखांचे घड्याळ; दहा लाखांचे चित्र

वेळ्ळीचे भाजपचे उमेदवार सावियो रॉड्रीग्ज यांच्याकडे पाच लाख रुपयांचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विश्‍वजित राणे यांच्याकडे 10 लाखांचे चित्र व 25 लाखांचा कॅमेरा असल्याचे नमूद केले आहे. बेंजामिन सिल्वा यांच्याकडे 4 , फ्रान्सिस सिल्व्हेरा यांच्याकडे 3 तर सावियो डिसिल्वा यांच्याकडे 2 मासेमारी ट्रालर्स आहेत. (गोवा निवडणूक)

हेही वाचलतं का?

Back to top button