Bhupinder Singh Honey : पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांना धक्का; पुतण्याला ईडीकडून अटक | पुढारी

Bhupinder Singh Honey : पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांना धक्का; पुतण्याला ईडीकडून अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पुतण्या भुपेंद्र सिंग हनीला (Bhupinder Singh Honey) ईडीकडून अटक करण्यात आली आहे. (दि.०४) गुरूवारी संध्याकाळच्या दरम्यान हनीला ईडीने ताब्यात घेतले आहे. आज त्याला सीबीआयकडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हनीला अवैधरित्या वाळू उत्खनन केल्याप्रकरणी अटक झाली आहे. तर सीबीआयकडून सांगण्यात आले की त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतले आहे.

मागच्या महिन्यात हनीच्या काही संपत्तीवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडून ८ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ही कारवाई अवैद्य वाळू उत्खनन आणि जमिनीच्या देवाण घेवाणीवरुन झाली आहे.

Bhupinder Singh Honey : १२ लाखांचे घड्याळ जप्त

जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत काही महत्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन, २१ लाखांपेक्षा अधिक किमतीचे सोने याचबरोबर १२ लाखांच्या किंमतीचे घड्याळ तपासणी दरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे.

११७ सदस्यीय पंजाब विधानसभेच्या मतदानाच्या काही दिवस आधी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर १० मार्चला निकाल लागणार आहे.

२०१८ मध्ये पंजाब पोलिसांनी पंजाबमधील नवांशहरमध्ये अवैध वाळू उत्खननाबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी कुदरतदीप सिंग याची नवीनशहर येथे खाण होती.

कुदरतदीप सिंग यांनी दोन कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे ज्यात भूपिंदर सिंग हनी हे देखील संचालक होते. या प्रकरणात २६ आरोपी असून त्यात बहुतांश ट्रक चालक आहेत. एफआयआरनुसार पोलिसांनी अवैध वाळूने भरलेले ३० ट्रक पकडले होते. या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button