सिन्नरला भरचौकात शूज मार्टला आग; आगीत लाखोंचे नुकसान | पुढारी

सिन्नरला भरचौकात शूज मार्टला आग; आगीत लाखोंचे नुकसान

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : येथील छत्रपती शिवाजी चौकातील एका चप्पल-बूट दुकानाला बुधवारी (दि.२) सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

छत्रपती चौकात चेतन प्रकाश सातपुते यांचे सिन्नर फुटवेअर नावाचे दुकान असून या दुकानाला आग लागल्याचे सकाळी सात वाजेच्या सुमारास लक्षात आले. बघता बघता आगीने रौद्र रुप धारणे केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट हवेत झेपावता दिसून आले.

नागरिकांनी माहिती दिल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, आरोग्य निरीक्षक रवी देशमुख आदी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, जयेश बोरसे, स्वप्नील कासार, सागर डावरे, यशवंत बेंडकुळे आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

तीन ते साडेतीन तासानंतर आग आटोक्यात आली. भर चौकात आग लागलेली असल्याने आजुबाजुच्या दुकानांनाही धोका होता. मात्र अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणल्याने अन्य दुकानांना धोका पोहोचला नाही. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Back to top button