नागपूर-सुरत महामार्गावर ‘त्या’ कुटुंबीयांचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न ; वाचा नेमकं काय आहे प्रकरण | पुढारी

नागपूर-सुरत महामार्गावर 'त्या' कुटुंबीयांचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न ; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : साक्री येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणातील पिडित कुटुंबीयाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासन व अधिकारींमुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी कुटुंबीयांकडून शहरातील नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावरील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर साक्रीत भाजपच्या नगरसेवकांसह समर्थकांनी केलेल्या मारहाणीत मोहिनी जाधव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पीडित जाधव व जगताप कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणामुळे कधी नव्हे ते साक्री शहराचे वातावरण तापले असून शहराची शांतता धोक्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक व्हावी व कुटुंबाला शासकीय, आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी जगताप व जाधव कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वीच तालुका प्रशासनाला निवेदन देत प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

या अनुषंगाने प्रशासनाकडूनही देखील खबरदारी घेण्यात येत होती. आज सकाळी साडेआठच्या सुमारास शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमापूर्वी गोटू जगताप यांच्यासह कुटुंबीयांनी अचानक येथील तहसील कार्यालयासमोर नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावर येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांना बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला.

Back to top button