जळगाव जेल : किरकोळ कारणावरून कैद्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी | पुढारी

जळगाव जेल : किरकोळ कारणावरून कैद्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

जळगांव, पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा कारागृहातील एका कैद्याने दुसऱ्या बॅरेकमध्ये जाऊन टीव्ही लावला असता, त्यावरून जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याचाच एकाने चावा घेतला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जळगाव जेल)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, जळगाव जिल्हा कारागृहातील अमोल ऊर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) (वय-29 रा. खेडी ब्रुदूक ता. जळगाव) हा खुनाच्या गुन्ह्यात या ठिकाणी शिक्षा भोगत आहे.

गुरुवारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर हे कारागृह गस्त घालत होते.  त्यावेळी कैदी गणेश सोनवणे हा त्याच्या बॅरेकच्या बाहेर निघून गेल आणि त्याने ९ नंबरच्या बॅरेकमध्ये जावून टिव्ही लावला. त्यावेळी न्यायबंदी समाधान वाल्मीक शेवाळे याने अमोल याला, तू आमच्या बॅरेक मध्ये का आलास? येथे आमचे साहित्य चोरीला जाते असे सांगितले. (जळगाव जेल)

त्यावरून वादाची ठिणगी पडली. या वादात टिव्ही फोडण्याची धमकी देत, टिव्हीचा रिमोट तोडण्यात आला. त्यानंतर अमोलचा मित्र तेजस दिलीप सोनवणे याच्यासह चेतन पितांबर सोनार या दोघांनी सुरू असलेल्या वादात भाग घेतला. आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारी झाल्यावर कारागृह पोलीस कर्मचारी निवृत्ती काशिनाथ पवार, सुभाष बाबुराव खरे व तुरूंगाधीकारी त्या ठिकाणी आले. त्यांनी अमोल याला वादातून बाजूला सारत असतानाच त्याने कारागृह अधीकार्‍यांशी वाद घातला. (जळगाव जेल)

हाणामारी थांबवून अधीक्षकांच्या सांगण्यावरुन अमोल सोनवणे याला बॅरेकमध्ये बंद करण्यास नेत असताना त्याने कर्मचारी दत्ता हनुमंत खोत, रोशन लहुगिरी, निवृत्ती पवार सुभाष रोकडे यांच्याशी झटापट केली. या झटापटीत दत्ता हनुमंत खोत या कर्मचार्‍याच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर खोत यांच्यावर वैद्यकीय उपचार करुन याप्रकरणी जिल्हापेठ पेालिसांत तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

Back to top button