बारामती : नगरसेवकाला महिलेनं ९ लाख ७६ हजारला गंडवलं ! बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी | पुढारी

बारामती : नगरसेवकाला महिलेनं ९ लाख ७६ हजारला गंडवलं ! बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

बारामती; पुढारी वृत्तसेवा

बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करून देते, भाच्यांना बँकेत नोकरी लावते असे सांगत, एका महिलेने येथील एका नगरसेवकाची ९ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत संबंधीत नगरसेवकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पैसे देवूनही आपले काम होत नसल्याने, आपण तिच्याकडे पैसे परत मागितले. मात्र तिने आपल्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. (Baramati Cheating)

फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, मार्च २०१८ ते जुलै २०२१ या कालावधीत ही घटना घडल्याचे . फिर्यादी हे नगरसेवक असल्याने प्रभागात त्यांच्या अनेकांशी कामानिमित्त भेटीगाठी होत असतात. त्यातून सन २००० साली त्यांची जावळे या महिलेशी ओळख झाली.

तुमचे कर्ज प्रकरण करून देवू का? अशी विचारणा

त्यानंतर संबंधित महिला पुण्यात वास्तव्याला गेल्याने तिची पुन्हा भेट झाली नाही. २०१८ मध्ये फिर्यादी हे बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये कन्स्ट्रक्शन व्यवसायासाठी कॅश क्रेडीट घेण्यासाठी गेले असता, त्या महिलेची पुन्हा भेट झाली. त्यावेळी तिने मी स्टेट बँकेत नोकरीला आहे, तुमचे कर्ज प्रकरण करून देवू का? अशी विचारणा केली होती. (Baramati Cheating)

त्यानंतर काही दिवसांनी फिर्य़ादी हे मेहुण्यासह पुण्यातील गुलटेकडी इथल्या एका बँकेत गेले. त्यावेळी तिने आपण बँकेची झोनल मॅनेजर असल्याचे सांगत तिचे ओळखपत्र दाखवले. आणि तुम्हाला ३ कोटींचे कर्ज मिळवून देते असे सांगितले.

त्यानुसार फिर्य़ादीने त्यांना आवश्यक ती कागदपत्रे दिली. पुण्यातील एका हॉटेलमध्ये तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली. परंतू त्यानंतरही कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याने, फिर्यादीने विचारणा केली असता तिने वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने १३ मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत तिच्या खात्यावर तसेच मेहुण्याच्या हस्ते रोख स्वरुपात ७ लाख ७६ हजार रुपये दिले. (Baramati Cheating)

त्यानंतरही आपले कर्ज प्रकरण मंजून झाले नसल्याने, फिर्य़ादीने तिच्याकडे पैसे परत मागितले. त्यावेळी तिने तुमच्या नात्यातील कोणाला बॅंकेत नोकरी हवी असल्यास ती मिळवून देते असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवत दोन भाच्यांना नोकरीला लावा असे फिर्य़ादीने सांगितले. त्यापोटी तिने आणखी २ लाख रुपयांची माघणी केली. ते पैसे तिने पुण्यात रोख स्वरुपात स्विकारले.

मार्च २०२१पर्यंत ऑर्डर काढून देते, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर तिने पैसेही परत दिले नाहीत आणि नोकरीही लावली नाही. त्यामुळे फिर्य़ादीने पैसे माघारी करण्यासाठी तगादा लावला असता तिने तुम्ही मला पैसे मागितल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button