Malegaon Murder : १२ तासांच्या आत चौघे मारेकरी जेरबंद | पुढारी

Malegaon Murder : १२ तासांच्या आत चौघे मारेकरी जेरबंद

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सोयगावमधील इंदिरानगर भागात मंगळवारी (दि.११) भरदुपारी झालेल्या खूनाचा तपास 12 तासांच्या आत पोलिसांनी लावला आहे.  पाचपैकी चौघा संशयित मारेकऱ्यांना अटक झाली असून, त्यांना बुधवारी (दि. १२) मालेगाव न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

घटनेत बालंबाल बचावलेले दादाजी काशिनाथ ..गुंजाळ (४०, रा. गवळीवाडा) यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते आणि सुनिल बाजीराव गुंजाळ (३७, रा. गवळीवाडा) हे मंगळवारी पाटणे येथून दुचाकीने सोयगावच्या दिशेने येत असताना त्यांच्या समाजातील पाच जण दुचाकीने पाठीमागून आले.

दोघांमध्ये डुक्कर चोरण्यावरुन जुना वाद होता, त्यातूनच ते मागावर असल्याने गुंजाळ द्वयी भरधाव वेगात निघाले. मात्र, मागावरील एकाने त्यांची दुचाकी पाडली. दोघे पडले असताना लाथाबुक्क्यांची मारहाण करण्यात आली. अजय कैलास कापसे (रा. मोतीबाग नाका) याने धारदार चाकुने सुनिलच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर सपासप वार केलेत. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला होता. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने हल्लेखोरांची पोलिसांनी ओळख पटवत तत्काळ त्यांचा माग काढण्यात आला. त्यात अजय कापसे, योगेश कापसे, लखन गायकवाड, विकास मांजरे (सर्व रातीबाग नाका) हे रात्रीतून हाती लागले. त्यांचा पाचवा साथीदार फरार असून, त्याचीही ओळख पटलेली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पी. आर. काळे हे तपास करीत आहेत. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळी कॅम्प पोलिस ठाणे गाठून जोपर्यंत सूत्रधार अटक होत नाहीत, तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा इशारा दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी झालेल्या कारवाईची माहिती देत उर्वरितांना पकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यविधी पार पडला.

हेही वाचा :

Back to top button