पुणे : राज्यात पावसाचे आगमन होताच, पेरणीला वेग आला. कापूस, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या लागवडीवरच शेतक-यांचा भर आहे. पाऊस लांबल्याने मूग व उडदाऐवजी शेतकरी तुरीकडे वळाले आहेत. राज्यात सोमवार पर्यंत 66.78 लाख हेक्टर (47 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाने जूनमध्ये दडी मारली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. अनेक ठिकाणी पेरण्यांसाठी पुरेशा पावसाची आवश्यकता आहे. तरीदेखील शेतकरीवर्ग पेरणीकडे वळला.
राज्यातील पाच जिल्ह्यांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला असून, उर्वरित 29 जिल्ह्यांत 10 जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अकोला या पाच जिल्ह्यांत कमी पाऊस झाला. राज्यातील 355 तालुके विचारात घेतल्यास, 37 तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा, 88 तालुक्यांत 75 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. 50 ते 75 टक्केच्या दरम्यान 141 तालुके, 25 ते 50 टक्केच्या दरम्यान 88 तालुके, तर 25 टक्केपेक्षाही कमी पाऊस एका तालुक्यात पडला आहे.
राज्यातील पेरण्यांचा कल पाहिल्यास, कापसाची पेरणी 28.11 लाख हेक्टर, सोयाबिनची 25.18 लाख हेक्टर, तुरीची लागवड 5.72 लाख हेक्टर क्षेत्रांवर झाली. या तीन पिकांच्या एकत्रित पेरणीचे क्षेत्र 59 लाख हेक्टर आहे. मुगाची पेरणी 64 हजार हेक्टर, तर उडदाची पेरणी 53 हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. पाऊस लांबल्याने, मूग, उडीद यांचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, कापूस, तूर यांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज राज्याच्या कृषी विभागाने वर्तविला आहे.
शेतकर्यांचा कल
कापसाच्या पेरणीकडे शेतक-यांचा कल असून, सरासरीच्या तुलनेत 67 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीनचीही 61 टक्के, तर तुरीची 44 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. या पिकांची सर्वाधिक पेरणी झालेले जिल्हे क्रमाने पाहिल्यास, कापसाची यवतमाळ, जळगाव, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, सोयाबीनची लातूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, तर तुरीच्या पेरणीत यवतमाळ, अमरावती, नागपूर, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो.
विभाग सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र पेरणीची टक्केवारी
कोकण 4.14 0.44 10.65
नाशिक 20.65 8.55 41.41
पुणे 10.65 2.11 19.80
कोल्हापूर 7.28 1.67 22.88
औरंगाबाद 20.90 9.27 44.36
लातूर 27.67 15.16 54.78
अमरावती 31.59 20.65 65.36
नागपूर 19.15 8.94 46.67
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.