Pawankhind | पावनखिंड संग्राम दिन विशेष : पन्हाळगड-विशाळगड रणभूमीचे जतन व्हावे | पुढारी

Pawankhind | पावनखिंड संग्राम दिन विशेष : पन्हाळगड-विशाळगड रणभूमीचे जतन व्हावे

कोल्हापूर; सागर यादव :  जगभरातील विविध देशांत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन-संवर्धन आणि संरक्षण अत्यंत अनोख्या पद्धतीने केले जाते. अनेक देशांत घडलेल्या इतिहासाची साक्ष देणार्‍या रणभूमींचे जतन जसेच्या तसे करण्यात आले आहे. या धर्तीवर शिवकालीन इतिहासाची साक्ष देणार्‍या पन्हाळगड ते विशाळगड या रणभूमीचे संरक्षण गरजेचे आहे. या परिसरातील शिवकालीन मूळ जंगल (स्थानिक वनस्पतींनी व्यापलेले), फरसबंदी मार्ग यासह विविध पाऊलखुणांच्या संवर्धनासह पर्यटन विकासासाठी या इतिसाची इत्थंभूत माहिती देणारे इंटरपिटेशन केंद्र निर्माण होणे अत्यावश्यक आहे, अशी सूचना इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरकारला केली आहे. (Pawankhind)

शिवकाळात दि. 12 व 13 जुलै 1660 या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर अभूतपूर्व इतिहास घडला. रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवछत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली शेकडो बांदल-मराठा सैनिकांनी शत्रूच्या हजारो सैनिकांना कडवी झुंज दिली. यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणार्‍या अनेक पाऊलखुणा पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर फरसबंदी मार्ग, शिवकालीन विहीर, अज्ञात समाध्यांच्या रूपाने आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. या गोष्टींच्या सखोल संशोधनाबरोबरच त्यांच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे इंद्रजित सावंत यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.

शत्रूच्या दस्तऐवजांचा अभ्यास महत्त्वाचा

पावनखिंड प्रकरणातील अज्ञात मावळ्यांची नावे प्रकाशझोतात आणण्यासाठी शत्रूच्या म्हणजेच आदिलशाही दरबाराशी संबंधित तत्कालीन पत्रव्यवहार, ऐतिहासिक दस्तऐवज, सिद्दी जोहर, सलाबत खान, पीडनाईक बेडर यांच्याशी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास व संशोधन होणे अत्यावश्यक आहे, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले आहे. पावनखिंड प्रकरणाचा अभ्यास करताना जावळीचा पाडाव (1656), प्रतापगडच्या युद्धात शिवछत्रपतींनी अफजल खानाला ठार मारून केलेला भीम पराक्रम (10 नोव्हेंबर 1659). या प्रकरणातील बांदल-देशमुखांचे योगदान, दीपाऊ बांदल या कर्तृत्ववान महिलेचा पराक्रम, बांदल-देशमुखांच्या तुकडीने आपल्या कर्तृत्वाने निर्माण केलेला विश्वास, अशा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. याचबरोबर पन्हाळा व विशाळगडाची भौगोलिक स्थिती, इंग्रजांकडून आणलेल्या तोफा, वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय, मसाई पठारमार्गे असणार्‍या प्राचीन मार्गाची निवड, बांदल सैनिकांच्या तुकडीचीच नेमणूक, स्वराज्यावरील शाहिस्तेखानाचे संकट अशा संदर्भांचाही विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्वांबरोबरच प्राचीन काळातील व्यापारी मार्ग असणार्‍या पांढरेपाणी व पावनखिंड परिसरातील फरसबंदी मार्गांचे अवशेष, शिवकालीन विहीर, अज्ञात समाध्यांचे जतन-संरक्षण तातडीने व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंतीला महत्त्व

पावनखिंड रणसंग्रामाच्या स्मृती जपण्यासाठी प्रतिवर्षी विविध संस्था-संंघटनांच्या वतीने ऐन पावसाच्या जुलै महिन्यात ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राच्या लढवय्या इतिहासाची अलिखित परंपरा बनलेली ही मोहीम आज देशव्यापी बनली आहे. धो-धो कोसळणार्‍या पावसात सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दर्‍या-खोर्‍यांतील जंगलातून दगडगोटे-चिखल-काट्याकुट्यातून खडतर असा या मोहिमेचा मार्ग आहे. चिंब पावसात भिजत, खाऊन-पिऊन एन्जॉय करत अ‍ॅडव्हेंचरसह रील, फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अ‍ॅपवर क्लिप, व्हिडीओ, फोटो शेअर करण्यापुरतेच बहुतांशी ट्रेकर्स यात सहभागी होत असल्याचे वास्तव आहे. यामुळे पावनखिंडीचा रणसंग्राम केवळ पन्हाळगड ते पावनखिंड या पदभ—मंतीपुरता मर्यादित राहिला आहे.

अनावश्यक गोष्टींचे गैरसमज दूर व्हावेत

पावनखिंड परिसरात काही वर्षांपूर्वी शासनाने एका भव्य बुरुजाची निर्मिती केली आहे. या उंच बुरुजावर जाऊन संपूर्ण परिसर सर्वांना पाहता यावा हा उद्देश आहे. मात्र, अलीकडच्या काळात काही लोकांनी या बुरुजाचे नामकरण ‘ध्वजस्तंभ’ असे केले असून, चप्पल घालून या बुरुजावर न जाण्याची सक्ती केली जात आहे. सध्या जी पावनखिंड म्हणून दाखविली जाते ती एक नैसर्गिक घळ म्हणजे कासारी नदीचे उगम स्थान असून, पावसाळ्यात प्रचंड वेगाने पडणारे पाणी धोकादायक असल्याने ही घळ पाहताना सुरक्षितपणे पाहावी, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी केले. (Pawankhind)

Back to top button