नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या | पुढारी

नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनपा हद्दीतील तीन विभागांत गुरुवारी (दि.२२) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील मखमलाबाद नाका येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतीस मोहोर बंद (सील) करण्यात आले. तर के. के. वाघ कॉलेजजवळील कॅनाॅल लगतच्या अनधिकृत सात ते आठ टपऱ्या विभागाने निष्काशित केल्या आहेत.

या टपऱ्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चहाची टपरी, केश कर्तनालय, दुचाकी वाहन गॅरेज, भंगारची दुकाने, चिकन असे व्यवसायाचे स्वरूप होते. दोन टपऱ्या बंद होत्या. सदर मिळकत सील करताना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मनपाचा दैनंदीन पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. या कारवाईदरम्यान पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे, नगर नियोजन विभागचे शाखा अभियंता हेमंत नांदुर्डीकर उपस्थित होते. तसेच सहाही विभागांचे पथकप्रमुख, कर्मचारी अतिक्रमण निर्मूलन वाहनांसह उपस्थित होते.

नाशिक पश्चिम विभागामार्फत विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. रविवार कारंजा ते मेनरोड ते धुमाळ पॉइंट ते शालिमार या परिसरात रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर पथकाने संयुक्त मोहीम राबवून कारवाई केली. येथील वाहतूक मार्ग मोकळा करून दिला. कारवाईदरम्यान पाच बॅगा, सहा प्लास्टिक बॉडीसह विविध प्रकारचे कपडे, पिशव्या, १६० बूट-चप्पल, दोन स्टॅण्ड बोर्ड, नऊ खुर्च्या, फॅन असे साहित्य जप्त केले. नवीन नाशिक विभागातही आज कारवाई केली. महालक्ष्मीनगर, उपेंद्रनगर येथे अनधिकृत भाजी ते व फळविक्रेते यांच्यावर कारवाई केली आहे.

२२ क्रेट, प्लास्टिक पाट्या, स्टॅण्ड बोर्ड, जाहिरात फलक, वजनकाटे, भाजीपाला असे एक गाडी साहित्य कारवाईदरम्यान जप्त केले. जप्त केलेले सर्व साहित्य ओझर येथील मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या गोदामामध्ये जमा केले. शहरात ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना असतील त्यांनी स्वत: हून अनधिकृत बांधकामे काढून घ्यावे अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई होईल, असे अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांनी कळविले आहे.

हेही वाचा : 

Back to top button