इचलकरंजीसह शिरोळ तालुक्यात बनावट दारूचा महापूर

बनावट दारू
बनावट दारू

कोल्हापूर, विशेष प्रतिनिधी : इचलकरंजी आणि जयसिंगपूर या शहरांसह संपूर्ण शिरोळ तालुक्यात बनावट आणि हुबळीमेड दारूचा महापूर वाहताना दिसत आहे. या बनावट दारूमुळे अनेकांचे आयुष्य आणि संसार देशोधडीला लागले आहेत, तसेच तालुक्यातील हजारो तळीरामांना जीवघेण्या व्याधी जडलेल्या दिसत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मात्र या सगळ्या प्रकारांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरूंदवाड शहर आणि शिरोळ तालुक्यात शेकड्यावर बिअरबार, परमीटरूम आहेत. यापैकी अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बनावट आणि हुबळीमेड दारूचा रतीब सुरू असल्याचे दिसत आहे. चाळीस-पन्नास रुपयांमध्ये मिळणारी बनावट दारू दोन-अडीचशे रुपयांनी ग्राहकांच्या गळ्यात मारण्याचा गोरखधंदा या ठिकाणी फार्मात आलेला दिसत आहे. या भागात गेल्या काही दिवसांत खर्‍या दारूपेक्षा बनावट दारूचीच चलती असल्याचे दिसत आहे. भागात असलेल्या काही धाब्यांवरही अगदी खुलेआमपणे बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. काही स्थानिक बहाद्दरांनी तर विदेशी दारू म्हणून विदेशी दारूच्या बाटल्यांमधून देशी आणि गावठी दारूचाही पुरवठा सुरू केलेला दिसत आहे. शिरोळ तालुक्यात नदीकिनारी कित्येक हातभट्ट्या धडधडताना दिसतायत. या हातभट्ट्यांवरील दारूत वेगवेगळी रसायने आणि कृत्रिम स्वाद मिसळून विदेशी लेबलमधून त्याचा पुरवठा होताना दिसत आहे.

ही बनावट दारू अनेक तळीरामांंच्या संसाराची धूळधाण करताना दिसत आहे. या बनावट आणि विषारी दारूमुळे शेकडो तळीरामांना जीवघेणे आजार जडले आहेत. लकवा, जठरात पाणी होणे, काही प्रमाणात भ्रमिष्टपणा, विसरभोळेपणा, द़ृष्टी मंदावणे, भूक मंदावणे, हाता-पायांना सतत मुंग्या येणे, अचानक मेंदूचे संतुलन सुटणे, ऐकायला कमी येणे अशा एक ना अनेक व्याधी या बनावट दारूमुळे तळीरामांना जडलेल्या दिसत आहेत.

अनेक तळीराम तर या बनावट दारूमुळे अंथरूणालाच खिळून पडले आहेत. एकदा का एखादी व्यक्ती या बनावट दारूच्या आहारी गेली की त्यातून बाहेर पडणे मुश्कील बनते. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत दारूशिवाय कोणताही विचार त्यांच्या मनात येत नाही. या बनावट दारूमुळे अनेकांचे व्यवसाय, नोकरी-धंदे बसले आहेत.

इचलकरंजी शहरात हातमाग, यंत्रमाग व्यवसायामुळे आणि शिरोळ तालुक्यात शेतमजुरीसाठी कर्नाटकसह महाराष्ट्राच्या अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात मजूर कुटुंबे पोटा-पाण्यासाठी म्हणून स्थायिक झाली आहेत. मात्र, बनावट दारूमुळे या मजुरांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मजूरवर्ग या बनावट दारूच्या आहारी गेलेला दिसत आहे.

काही बिअरबार, परमीट रूमवर, काही हॉटेल्स आणि धाब्यांवर, काही दुकानांमधून तर काही ठिकाणी चक्क पानटपर्‍यांतूनही विनासायास ही बनावट दारू उपलब्ध होत असल्याचे दिवसेंदिवस त्याचा प्रसार जोमाने होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात या बनावट दारूच्या आहारी जाताना दिसत आहे. हे प्रकार वेळीच रोखले नाहीत तर या भागात बनावट दारूमुळे सामाजिक शांतता-सुव्यवस्था पार रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

बनावट दारूच्या या महापुराबाबत या भागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला काही माहीत नाही, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. या सगळ्या प्रकाराची खडा न् खडा माहिती या विभागातील संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना असल्याची चर्चा आहे. कारण बनावट दारूचा महापूर वाहणार्‍या भागात संबंधितांचे नेहमी येणे-जाणे दिसून येते, संबंधित ठिकाणी यातील काही मंडळींचा दैनंदिन राबताही बघायला मिळतो. याचा अर्थ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लोकांचेच या सार्‍या प्रकाराला अर्थपूर्ण अभय मिळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news