Lok Sabha election 2024 : मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर पाहणी | पुढारी

Lok Sabha election 2024 : मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहार पोलिसांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांची पाहणी करीत त्यासंदर्भातील अहवाल महासंचालक कार्यालयास सादर केला आहे. यात शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांचीही माहिती आहे. तसेच मतदानाच्या वेळी अतिरिक्त बंदाेबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष शाखेच्या निवडणूक कक्षासह शहर पोलिसांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व मोनिका राऊत यांनी परिमंडळ एक व दोनमधील मतदान केंद्रांची पाहणी केली. तर गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव व चंद्रकांत खांडवी यांनी मतदान केंद्रांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेतला. मतदान केंद्रांची सुरक्षा, बंदोबस्त, वाहनतळांचा आढावा पूर्ण झाला आहे. तसेच गत दोन पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर गोंधळ झाला, त्या ठिकाणच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. खबरदारी म्हणून संबंधित केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

सुरक्षिततेची खबरदारी
मतदान केंद्रांलगतची संरक्षक भिंत, प्रवेशद्वाराची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी सीसीटीव्ही, सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. यासह मतदान केंद्रांलगतच्या शंभर मीटरपर्यंतची दुकानचालक व स्थानिकांना सूचना व नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासह बंदोबस्ताचे नियोजन व मतदान केंद्रांजवळील वाहनतळाची व्यवस्था यांचा आढावा घेतला जात आहे.

मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. अतिरिक्त मनुष्यबळ मतदानाच्या तीन-चार दिवसांपूर्वी शहरात दाखल होईल. सर्व मतदान केंद्रांवरील सोयींचा आढावा घेण्यात आला आहे. – प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे.

Back to top button