

पुढारी ऑनलाईन डेस्क : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन (सीआयएससीई) ने सोमवारी दहावी आयसीएसई (ICSE) आणि बारावी आयएससी (ISC) परीक्षा वर्ष २०२४ चे निकाल सोमवारी जाहीर केले. यात मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६५ टक्के असून मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९९.३१ टक्के एवढी आहे.
ICSE ची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.४७ टक्के (२,४२,३२८ उत्तीर्ण) आहे तर ISC ची ९८.१९ टक्के (९८,०८८ उत्तीर्ण) आहे. इयत्ता १० आणि १२ वीचे विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org, results.cisce.org वर पाहू शकतात.
ISC (भारत) मध्ये दक्षिणेकडील प्रदेशाने उत्तीर्ण होण्याची सर्वाधिक ९९.५३ टक्केवारी नोंदवली आहे. त्यानंतर पश्चिम विभागाचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.३२ टक्के आहे. दुसरीकडे, ICSE (भारत) मध्ये पश्चिम प्रदेशात उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९९.९१ टक्के आहे. त्यानंतर दक्षिण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.८८ टक्के एवढी आहे.
इयत्ता १० मध्ये १०० टक्के उत्तीर्ण सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा इंडोनेशिया, सिंगापूर आणि दुबई (UAE) मधील आहेत. ICSE परीक्षा ६० लेखी विषयांसाठी घेण्यात आली होती. ज्यात २० भारतीय भाषा, १३ परदेशी भाषा आणि १ शास्त्रीय भाषेचा समावेश होता, असे CISCE ने सांगितले.
CISCE ने ICSE आणि ISC परीक्षांसाठी प्रमुख विषयांचा अभ्यासक्रम कमी केला होता. ICSE साठी इतिहास आणि नागरिकशास्त्र, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, व्यावसायिक अभ्यास, कॉम्युटर अॅप्लिकेशन्स, इकॉनॉमिक अॅप्लिकेशन्स, कमर्शिअल ॲप्लिकेशन्स, होम सायन्स, शारीरिक शिक्षण, योग आणि पर्यावरणीय आदी अभ्यासक्रमांत सुधारणा केली होती.
हे ही वाचा :