सोलापूर : पिके धोक्यात; शेतकरी चिंतित | पुढारी

सोलापूर : पिके धोक्यात; शेतकरी चिंतित

केत्तूर; पुढारी वृत्तसेवा :  117 टीएमसी भरलेले उजनी धरण पाणी वाटपाचे योग्य नियोजन न केल्यामुळे मायनस 28 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. ऊस पिकास कितीही पाणी दिले तरी वारे व उष्णतेमुळे पिके लगेच सुकत आहेत.

गेल्या वर्षी 29 मे ला महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सूनचा पाऊस 23 जून तारीख आली तरी अजून यायचे नाव घेत नाही. हवामान अभ्यासक संस्थांच्या मते दरवर्षी 6 ते 8 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमधून महाराष्ट्रात दाखल होतोच; परंतु यावर्षी बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यास उशीर झालेला आहे. उजनी पाणलोट पट्ट्यात जोरदार वारे सुटले असून अगोदरच ऊन व उष्णता आहे. त्यात जोरदार वारे वाहू लागल्याने शेतातील ओल लवकरच उडत आहे. त्यात विजेचे लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. पर्यायाने लाखो रुपये खर्च केलेले शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत.

उजनीची पाणी पातळी वरचेवर कमी होऊ लागल्याने पाण्यात टाकलेल्या पाईप उघड्या पडल्या आहेत. तरीही शेतकरी चर खोदून पाणी मूळ पाईपच्या ठिकाणी पाणी येईल असे प्रयत्न करीत आहेत. तर काही शेतकरी पाईप वाढवून पाण्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पावसाने लांबवर हुलकावणी दिल्यास वाढलेली पिके पूर्णत: हातातून जाण्याची शक्यता आहे.

दुष्काळी परिस्थितीची भीती

हवामान अभ्यासकांच्या मते अलनिनोचा प्रभाव वाढला की भारतात दुष्काळ पडण्याचे चिन्ह असते. त्याचप्रकारे या वर्षी परिस्थिती तयार झालेली आहे .

Back to top button