Mission Bhagiratha : ‘मिशन भगीरथ’मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर | पुढारी

Mission Bhagiratha : 'मिशन भगीरथ'मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा परिषदेने दुसऱ्या राज्यात विलीन होण्याची मागणी करणाऱ्या सुरगाणा तालुक्यासाठी विशेष आराखडा तयार केला असला तरी त्याची अंंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिशन भगीरथ प्रयासमध्ये  सुरगाणा तालुक्यात अद्याप एकच काम पूर्ण झाल्याचे बघायला मिळत आहे. तुलनेने इतर तालुक्यांमध्ये चांगली कामे झाली आहेत. 

मिशन भगीरथ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून १५ तालुक्यांमध्ये जलसंधारणाची ६२५ कामे प्रस्तावित असून, या कामांची रक्कम जवळपास ११० कोटी रुपये आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १५ तालुक्यांमधील १५६ गावांमध्ये पाच ते ३० लाख रुपयांदरम्यान सिमेंट बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. या योजनेतून सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक ११३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यापैकी केवळ ११ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या मंजूर कामांपैकी केवळ सात कामे सुरू असून, त्यातील केवळ एक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू होतील, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे करण्यासाठी मिशन भगीरथ हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेतून सध्या १५ तालुक्यांमध्ये सिमेंट बंधाऱ्यांची ३१ कामे पूर्ण झाली असून, ३० जूनपर्यंत या योजनेतून जवळपास १५० सिमेंट बंधारे पूर्ण होणार आहेत. सुरगाणा तालुक्यासाठी विकासकामे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी देऊनही तेथे आतापर्यंत केवळ एकच सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे विकासाच्या बाबतीत मागे असणारा सुरगाणा त्याच तालुक्यासाठी तयार केलेल्या मिशन भगीरथमध्येही पिछाडीवरच आहे.

काही महिन्यांपूर्वी सुरगाणा तालुक्यातील काही गावांच्या सरपंचांनी विकास होत नसल्यामुळे गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींची धावपळ उडाली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरगाणा तालुक्यातील गावांचे सरपंच व प्रशासन यांची बैठक घेऊन सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करून शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा यांचा आढावा घेतला. यामध्ये पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर हा केवळ सुरगाणा तालुक्यातीलच नाही, तर संपूर्ण आदिवासी भागाचा प्रश्‍न असल्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी मिशन भगीरथ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना जलसंधारण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यात सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडेारी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव नाशिक, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील १५६ गावे निश्‍चित करण्यात आली आहेत.

तालुकानिहाय पूर्ण झालेली कामे

बागलाण ५

चांदवड ३

देवळा ५

दिंडोरी १

इगतपुरी २

कळवण ०

मालेगाव ४

नांदगाव ५

नाशिक ०

निफाड ०

पेठ २

सिन्नर ०

सुरगाणा १

त्र्यंबक ३

येवला 5

हेही वाचा :

Back to top button