पुणे, शिरूरच्या ‘या’ बड्या उमेदवारांना नोटिसा; प्रचार खर्चात आढळली तफावत | पुढारी

पुणे, शिरूरच्या 'या' बड्या उमेदवारांना नोटिसा; प्रचार खर्चात आढळली तफावत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रशासन मात्र या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेस आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर तसेच शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवडणूक खर्चातील तफावती आढळल्याने पुन्हा प्रशासनाने नोटीस दिल्या आहेत. दुसर्‍या तपासणीत तफावतीमुळे उमेदवारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

उमेदवारांकडून त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या दुसर्‍या टप्प्यातील खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 13 लाख 6 हजार 474 इतका खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, निवडणूक खर्चाबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी शॅडो खर्चाचा अहवाल तपासून पाहिला. त्या वेळी प्रत्यक्षात दुसर्‍या टप्प्यात 49 लाख 34 हजार 58 रुपयांचा खर्च झाल्याची नोंद आढळली. त्यामुळे 36 लाख 27 हजार 584 रुपयांच्या खर्चाची तफावत झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे मोहोळ यांना नोटीस देण्यात आली आहे. काँग्रेस आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या खर्चात 11 लाख 67 हजार 709 रुपयांची तफावत आढळली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

आढळराव पाटील आणि कोल्हेंचा समावेश

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या शॅडो अहवालानुसार 53 लाख 38 हजार 334 रुपयांचा खर्च झाला असून, प्रत्यक्षात 22 लाख 91 हजार 548 रुपयांचा खर्च दाखविला आहे. त्यामुळे 30 लाख 46 हजार 786 रुपयांचा खर्चाची तफावत आढळली आहे. त्याशिवाय डॉ. अमोल कोल्हे यांनी 43 लाख 96 हजार 426 रुपयांचा खर्च झालेला असताना त्यापैकी केवळ 32 लाख 18 हजार 968 इतका खर्च दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात 11 लाख 77 हजार 458 रुपयांची तफावत आढळली आहे.

त्यामुळे कोल्हे, आढळराव या दोघांनाही नोटिसा देण्यात येऊन खुलासा मागण्यात आला आहे. तर शिरूर मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे राहुल ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अन्वर शेख, भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे यांच्यासह एकूण सहा जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

  1. आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर स्थगित; अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद
  2. कोल्हापूर : जिल्ह्यात चार अपघातांत सहाजण ठार
  3. कोल्हापूर : जिल्ह्यात थँलेसेमियाचे ३०० रुग्ण

Back to top button