धुळ्यात घरमालकाची हत्या करणाऱ्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

धुळ्यात घरमालकाची हत्या करणाऱ्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा

धुळे: पुढारी वृत्तसेवा

घर मालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश एस. सी. पठारे यांनी आज शुक्रवार (दि.28) ठोठावली आहे.

धुळे शहरातील चितोड रोडलगत असणाऱ्या राजहंस कॉलनीमध्ये 22 जून 2019 रोजी ही घटना घडली. या परिसरात स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश हिलाल श्रीराव (वय 62) हे परिवारासह राहत होते. त्यांनी अजिंक्य शिवनाथ मेमाणे या विद्यार्थ्याला भाडेतत्त्वावर एक खोली राहण्यासाठी दिली. श्रीराव आणि मेमाने हे दररोज सकाळी लवकर पायी फिरण्यासाठी जात असत. फिरून आल्यानंतर ते घराच्या गच्चीवर योगासने करण्यात करत असत. नेहमीप्रमाणे 22 जून रोजी हे दोघे बाहेरून फिरून आल्यानंतर गच्चीवर योगासने करण्यासाठी गेले. ही बाब श्रीराम यांची पत्नी प्रमिलाबाई यांनी देखील पाहिली. मात्र काही वेळानंतर मेमाने हा गच्चीवरून खाली आला. त्याने प्रमिलाबाई श्रीराव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे प्रमिलाबाई घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा करत घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. यावेळी गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले रमेश श्रीराव आढळून आले. त्यांचा खून मेमाणे यांनी केल्याची बाब उघड झाल्याने धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश एस सी पठारे यांच्यासमोर झाले. फिर्यादी पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मोहन भंडारी तसेच चैतन्य भंडारी यांनी काम पाहिले. तर सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड देवेंद्रसिंह तवर यांनी बाजू मांडली.

या प्रकरणी 13 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या कामकाजात न्यायालयाने महत्त्वाचे साक्षीदार तपासले. तपासाच्या दरम्यान घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी पडलेल्या स्लीपर्सच्या वास घेऊन श्वान वीरू याने आरोपी अजिंक्य मेमाणे यांच्या छातीवर पाय ठेवून त्याला ओळखले. त्यानुसार मेमाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही बाब सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या खुनाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. मयत रमेश श्रीराव यांना आरोपीसोबत शेवटी पहाटे पावणे सहाच्या सुमारास प्रमिलाबाई श्रीराव यांनी जिवंत पाहिले होते. त्यानंतर त्यांचा खून झाला. दरम्यान आरोपी मेमाने याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. मात्र त्याच्या कपड्यावर मयताचे रक्त आढळून आल्याची बाब देखील जिल्हा सरकारी वकील ॲड देवेंद्रसिंह तंवर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. फिर्यादी पक्षाचे वकील ॲड मोहन भंडारी आणि चैतन्य भंडारी यांनी देखील लेखी युक्तिवाद सादर करून सर्वोच्च न्यायालयाचे तसेच उच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांचे दाखले न्यायालयासमोर सादर केले. तर जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी खूनाच्या घटनेतील परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यातील श्रीराव यांची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी मेमाने यांनी मयताची पत्नी प्रमिलाबाई यांच्या गळ्यावर देखील धारदार शस्त्राने वार करून त्यांचा देखील खून करण्याचा प्रयत्न केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे न्यायालयाने साक्ष आणि पुरावे पाहता आरोपी अजिंक्य मेमाणे याला जन्मठेप तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच वर्षे सक्त मजुरीसह 5000 रुपये दंडाची शिक्षा देखील सुनावली आहे.

हेही वाचा:

Back to top button