कोण उठवणार कोणाचा बाजार? अकोले बाजार समिती निवडणूकीत नेत्यांसह उमेदवारांची तारांबळ | पुढारी

कोण उठवणार कोणाचा बाजार? अकोले बाजार समिती निवडणूकीत नेत्यांसह उमेदवारांची तारांबळ

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : एप्रिलच्या मध्यावर उन्हाचा पारा चढत असताना अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. पक्ष चिन्हाशिवाय होत असलेल्या निवडणुकीत माजी मंत्री मधुकराव पिचड, माजी आ.वैभव पिचड, आ. डॉ. किरण लहामटे, सिताराम पाटील गायकर या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अकोले कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण कोणाचा बाजार उठविणार, हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे. परंतु, दोन्ही गटांकडून या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याने शेवटपर्यंत चुरस अनुभवायला मिळणार आहे.

अकोले बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. तर भाजपाचे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ.वैभव पिचड या गटाच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आता १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पिचड व डॉ. लहामटे, गायकर या दोन्ही गटांकडून बहुमताचा दावा केला जात आहे. एक- एक मत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत थेट उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतेमंडळीही पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भौगोलिक, नैसर्गिक दृष्ट्या अडचणीच्या व विखुरलेल्या गावांतील मतदारांपर्यंत उमेदवारांना पोहचणे शक्य होत नसल्याने त्यांनी विभागनिहाय बैठका, मेळावे घेत प्रचार यंत्रणा राबवली आहे. एकूण ३४ उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सहकारी संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व, नोंदणी झालेले हमाल, व्यापारी उमेदवार मतदानासाठी वैयक्तिक भेट घेत मतदान करण्याचा जोगवा मागत आहेत. दोन्ही गटांनी दुसऱ्या फळीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर या निवडणुकीची सर्व जबाबदारी दिली आहे.

दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ.वैभव पिचड यांनीही या निवडणुकीची धुरा सांभाळल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी आ. डॉ.किरण लहामटे, सहकार क्षेत्रातील नेते आणि अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन अकोले खरेदी विक्री संघावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविल्याने अकोले कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणुकीकडे पिचड पिता पुत्राने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Back to top button